नागपूर - अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे त्यांना उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल केले जाणार आहे. सध्या त्यांच्यावर नागपूरच्या वॉकहार्ट रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांना श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने त्यांना उपचारासाठी मुंबईला हलवले जात आहे.
सहा ऑगस्टला खासदार नवनीत राणा यांना कोरोनाची लागण झाली होती. सुरुवातीला अमरावती येथे उपचार घेतल्यानंतर त्यांना नागपुरातील वॉकहार्ट रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आज (गुरुवारी) त्यांना श्वास घेताना त्रास जाणवू लागल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईच्या लीलावती रुग्णालयात दाखल करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
खासदार राणा या मुंबईला महामार्गाने मुंबईला जाणार आहेत. त्या प्रवासाकरिता सुमारे 12 ते 15 तासांचा कालावधी लागणार आहे. सध्या राणा कुटुंबात आमदार रवी राणा यांचे वडील, आई, बहीण, बहिणीचे पती, भाचा, पुतण्या यांच्या सह खासदार नवनीत राणा यांची मुलगी आणि मुलगाही कोरोनाबाधित आहेत.