अमरावती - जिल्ह्यात कोरोनाने थैमान घातले आहे. अमरावतीमध्ये दररोज 800पेक्षा जास्त कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असल्याने प्रशासनाची चिंता वाधली आहे. अमरावतीत सात दिवस लॉकडाऊन करण्यात आला आहे. मात्र, होम आयसोलेशनमध्ये असलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर फिरत असल्याने कोरोना संसर्ग आणखी वाढत असल्याचे समोर आले. त्यामुळे आता अमरावती महानगरपालिकाने कठोर भूमिका घेत होम आयसोलेशनमध्ये असलेल्या रुग्णांच्या घराबाहेर बोर्ड लावण्याचे काम सुरू केले आहे.
होणार फौजदारी कारवाई -
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण घराबाहेर निघाल्यास त्यांना 25 हजार रुपये दंड आकारून फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे मनपा प्रशासनाने सांगितले. निगेटिव्ह अहवाल येईपर्यंत त्यांच्या घरावर मनपा प्रशासन पाळत ठेवणार आहे. त्यासाठी रुग्णांच्या हातावर शिक्का व घरावर बोर्ड देखील लावण्यात येत आहे.
गुरूवारी राज्यात 8 हजार 702 नवीन रुग्ण -
आरोग्य विभागाने केलेल्या उपाययोजनांमुळे राज्यात गेल्या वर्षीच्या मार्चपासून सुरू झालेला कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात कमी झाला होता. मात्र, नागरिकांकडून कोरोना संदर्भातील नियमांचे पालन केले जात नसल्याने रुग्णसंख्या वाढू लागली आहे. गुरूवारी राज्यात 8 हजार 702 नवीन रुग्ण आढळले तर, 56 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.