अमरावती - कोरोना संसर्ग संपूर्णपणे रोखण्यासाठी लॉकडाऊनची कठोर अंमलबजावणी झाली पाहिजे. नियम न पाळणाऱ्यांवर काटेकोर कारवाई करावी. कोरोनावर संपूर्णपणे मात करण्यासाठी नियम पाळलेच गेले पाहिजेत. त्यामुळे यंत्रणांनी नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध अधिक धडकपणे कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज येथे दिले.
कोरोनासंसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने पालकमंत्री ठाकूर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेऊन विविध बाबींचा आढावा घेतला, त्यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस आयुक्त संजयकुमार बाविसकर, पोलीस अधिक्षक हरी बालाजी, महापालिका आयुक्त प्रशांत रोडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे आदी यांच्यासह इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या, की राज्यातील अर्थव्यवस्थेत सुधारणांच्या दृष्टीने आपण काही प्रमाणात शिथिलता आणली. उद्योग-व्यवसायांना परवानगी दिली. पण याचा अर्थ लॉकडाऊनमधून मोकळीक मिळाली असे नाही. मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व इतर दक्षतेचे पालन झालेच पाहिजे. त्यासाठी महसूल, महापालिका, पोलीस व इतर सर्व यंत्रणांनी कोणत्याही परिस्थितीत लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी केली पाहिजे. लॉकडाऊनच्या अंमलबजावणीत जराही कुचराई होता कामा नये, असे स्पष्ट निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
'जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या वाढतच आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी कुठल्याही परिस्थितीत नियमांचे पालन झालेच पाहिजे. निष्कारण घराबाहेर पडणा-या व्यक्ती, मास्क न वापरणारे, सोशल डिस्टन्सिंगचे पालन न होणारी दुकाने यांच्यावर वेळीच कारवाई झाली पाहिजे. अशी कारवाई सतत व नियमितपणे करावी. पोलीस आणि प्रशासनाने कुठेही गर्दी होणार नाही आणि व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राहील हे पाहिलेच पाहिजे', असे त्या म्हणाल्या.
'आपल्याला लॉकडाऊन संपवून सर्वांची सुरक्षितता व विकास साधायचा असेल तर ही साथ रोखणे आवश्यक आहे. लॉकडाऊनच्या सध्याच्या काळात त्याच्या सर्व नियमांची अंमलबजावणी काटेकोरपणे होणे आवश्यक आहे. जिल्ह्याच्या सीमेबाहेरून कुणी व्यक्ती येत असल्यास काटेकोरपणे तपासणी, संस्थात्मक विलगीकरण या गोष्टी पाळल्या गेल्याच पाहिजेत. बाहेरून येऊन कुणी संसर्ग पसरवता कामा नये, याची काळजी घ्यावी लागेल. बाहेरून येणा-या अनेकदा व्यक्तींत लक्षणे दिसत नाहीत. पण ती इतर ठिकाणी जाऊन संसर्ग पसरवू शकतात. त्यामुळे त्यांच्याबाबत काटेकोर कार्यवाही व्हावी. आवश्यक तिथे इतर यंत्रणांचे सहकार्य घ्यावे,' असे त्या म्हणाल्या.
'कोरोना साथ संपविण्यासाठी सार्वजनिक शिस्त निर्माण करावीच लागेल. त्यामुळे नियमभंग करणारांवर नियमितपणे कारवाई झालीच पाहिजे. स्वत: कुठलीही दक्षता न पाळता इतरांचे आरोग्य धोक्यात घालणाऱ्या व्यक्तींवर वेळेत कारवाई व्हावी. कायद्याचा धाक निर्माण करावा. सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन होणे हे सर्वांच्याच हिताचे आहे. त्यामुळे सार्वजनिक हिताला बाधा आणणाऱ्यांवर तत्काळ कारवाई करून कायदे व सुव्यवस्था राखावी,' असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.