अमरावती - मार्च महिन्यापासून कोरोनाने देशात धुमाकूळ घातला आहे. नाक, तोंड आणि डोळ्यांच्या माध्यमातून कोरोना विषाणूंचा मानवी शरीरात प्रवेश होत असल्यामुळे या तिन्ही अवयवांची काळजी घेणे अतिशय महत्वाचे झाले आहे. नागरिक बऱ्याच वेळ पर्यंत टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईलच्या स्क्रीन समोर बसत आहेत. शाळेचा अभ्यास मोबाईलवर ऑनलाईन सुरू असल्यामुळे चिमुकल्यांच्या डोळ्यावर ताण वाढला आहे. खरं तर कोरोनापसून स्वतःला जपणाऱ्या सर्वांनीच आपले, आपल्या मुलांचे डोळे किती सुरक्षित आहेत याबाबत काळजी घेण्याची सर्वांचीच जबाबदारी वाढली आहे.
डोळ्यांच्या डॉक्टरांकडे वर्षभर गर्दी राहत असली तरी आत जी गर्दी होत आहे त्यात डोळ्यांमध्ये होणारी जळजळ, डोळ्यातून सतत पाणी येणे आणि डोकं दुखत राहणे अशा तक्रारी वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळे बाहेर सारं बंद असताना घरात टीव्ही समोर तासंतास बसणाऱ्यांची संख्या वाढली आहे. वर्क फ्रॉम होममुळे कॉम्प्युटरवर ऑफिसची कामं आटोपल्यावरही अनेकजण कॉम्प्युटरवरच बराच वेळ घालवत असल्याचे प्रमाण वाढले आहे. घरातील अगदी लहान मूल चिडचीड करत असली की त्यांच्या हातात मोबाईल फोन देऊन त्यांना शांत करणाऱ्या पालकांची संख्याही कमी नाहीच.
कोरोनामुळे शाळा बंद असून विद्यार्थ्यांना मोबाईल फोनद्वारेच ऑनलाईन शिक्षण मिळत असल्याने विद्यार्थीही तासंतास मोबाईल फोनमध्येच डोकावून राहत असलेले सर्वत्र पाहायला मिळत आहेत. एकूणच टीव्ही, कॉम्प्युटर आणि मोबाईल फोनच्या वापरामुळे कळत नकळत चिमुकले आणि वृद्धांसह सर्वच वयोगटातील व्यक्तींमध्ये डोळ्यांच्या आणि डोक्याच्या त्रासाचे प्रमाण वाढले आहे.
आय.टी सेक्टरमध्ये काम करणारे तसेच कॉम्प्युटरवर बराच वेळ काम करणाऱ्यांच्या तक्रारी सध्या वाढल्या असल्याचे नेत्रतज्ज्ञ डॉ. सचिन बगडे 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले. सद्या रुग्णांची संख्या वाढते आहे. आपल्या अवतीभोवती नाका- तोंडाला मास्क न लावता एखादा कोरोना रुग्ण खोकलला किंवा शिकला तर त्याचे जंतू आपल्या नाका तोंडातून शरीरात प्रवेश करतात तसे ते डोळ्याच्या वाटेनेही शरीरात शिरतात. नाका तोंडाला आपण मास्क लावून कोरोनपसून जसे आपले संरक्षण करतो तसेच प्रोटेक्टिव्ह ग्लास, चष्मा यांचा वापर केल्याने कोरोनासह ब्ल्यू डॉट आणि रिफ्लेक्लेशन पासून डोळ्यांचा बचाव होऊ शकतो.ज्यांच्याकडे नंबरचे चष्मे आहेत त्यांनी आपल्या चष्म्याला प्रोटेक्टिव्ह ग्लास बसवून घ्यावा तसेच ज्यांना चष्मा नाही अशांनी झिरो नंबरचे ग्लास वापरायला हवेत, असे डॉ. सचिन बगडे म्हणाले.
डोळ्यात लाली येणे, डोळे सुजणे, डोळ्यातून पाणी वाहत राहणे सोबतच ताप, सर्दी किंव्हा खोकला असल्यास रुगणांनी आधी कोरोना चाचणी करून घ्यावी. कोरोना झाला नसेल तर नेत्रतज्ञांकडे जावे, असा सल्लाही डॉ. सचिन बगडे यांनी दिला.
विशेष म्हणजे कॉम्प्युटरवर सतत काम करणाऱ्या व्यक्तींनी ट्वेन्टी -ट्वेंटी-ट्वेंटी हा फॉर्म्युला वापरायला हवा असे डॉ. सचिन बगडे यांनी सांगितले. या फरमूल्यानुसार कॉम्प्युटरर काम करत असताना दार 20 मिनिटांनी 20 सेकंदपर्यंत 20 फूट लांब पर्यंत नजर टाकायला हवी यामुळे डोळ्यांचा ताण कमी होण्यास मदत होते. यासोबतच कॉम्प्युटरवर सलग काम करणाऱ्या व्यक्तींनी 2 तासाच्या कामानंतर 15 मिनिटं कॉम्प्युटरपासून दूर व्हावे. तसेच काम करत असताना भरपूर प्रमाणात पाणी प्यायला हवे अशी महत्त्वाची माहितीही डॉ. सचिन बगडे यांनी दिली.
सद्या मुलांचा अभ्यास हा कॉम्प्युटरवर सुरू आहे. या कोरोनाच्या काळात टीव्ही, मोबाईल फोन, कॉम्प्युटरचा वापर वाढला असताना डोळ्याध्ये अनैसर्गिक किरणं मोठ्या प्रमाणात जात आहेत. ही किरणं सर्वच वयातील व्यक्तींच्या डोळ्यांसाठी घातक आहेत. अशा परिस्थिती डोळ्यांच्या संरक्षणासाठी ब्ल्यू कट लेन्स बाजारात आल्या आहेत. त्यांचा वापर केल्याने डोळे सुरक्षित राहत असल्याची माहिती दृष्टी ऑप्टिकलचे संचालक पंकज कळमकर यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.
डोळ्यांचे विकार वाढत असले तरी कोरोनाच्या भीतीमुळे नागरिक घराबाहेर पडण्यास घाबरत असल्याने आमचा व्यवसायही इतर व्यवसायंप्रमाणे डाऊन असल्याचेही पंकज कळमकर म्हणाले.
एकूणच डोळ्यांच्या विकारावर अनेक पर्याय, इलाज, उपचार असले तरी आपल्या डोळ्यांची काळजी घेणे ही खरी जबाबदरी प्रत्येकाचीच आहे.