अमरावती - पेट्रोल दरवाढीविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोमवारी अमरावती शहरातील इर्विन चौकात कार ढकलून निषेध नोंदवला. यावेळी केंद्रातील भाजप सरकार विराधात घोषणा देण्यात आल्या.
अमरावतीत पेट्रोलचे दर 108 रुपये लिटर
अमरावती शहरात पेट्रोलचे दर लिटरमागे 108. 65 रुपये असून डिझेलचे दर 98.77 रुपये इतके आहे. पेट्रोल, डिझेलच्या या दरामुळे नागरिक हैराण झाले असून महागाई कमी करण्याचे खोटे आश्वसन देऊन सत्तेत आलेल्या नरेंद्र मोदी यांनी महागाई प्रचंड वाढविली असल्याने त्यांचा आम्ही निषेध नोंदवितो, असे एनएसयुआयचे जिल्हा अध्यक्ष संकेत कुलट 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलं.
दुचाकी लटकवली झाडावर
इर्विन चौक परिसरात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कार ढकलत पेट्रोल पंपावर आणली. यावेळी पेट्रोल पंप परिसरातील झाडाला दुचाकी लटकविण्यात आली.
इंधन दरवाढीविरोधात स्वाक्षरी मोहीम
पेट्रोल, डिझेल, गॅस या इंधन दरवाढीविरोधात काँग्रेसच्यावतीने स्वाक्षरी मोहीम राबविण्यात आली. यावेळी काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांच्यासह काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत, माजी महापौर विलास इंगोले, अशोक डोंगरे यांच्यासह पंकज मोरे, प्रमोद राऊत, निलेश गुहे, सागर देशमुख, तन्मय मोहोड, सागर यादव, संकेत साहू, संकेत बोके, राहुल येवले आदी उपस्थित होते.
हेही वाचा - खळबळजनक विधान अंगाशी; नाना पटोले यांच्यावर घुमजावची ओढवली नामुष्की
हेही वाचा - महाराष्ट्र कोरोनाची राजधानी तर ठाकरे सरकार रक्त पिपासु-भ्रष्टाचारी; आशिष शेलार यांची जहरी टीका