अमरावती - जिल्ह्यात काँग्रेसला मोठा धक्का बसण्याची दाट शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांना भाजप पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे प्राथमिक माहिती आहे. अशातच बबलू देशमुख आणि भाजप नेत्या निवेदिता चौधरी, अशोक बन्सोड, शिवसेनेचे माजी खासदास अनंत गुढे यांच्यासोबत रंगलेल्या चर्चाचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामुळे बबलू देशमुख यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना उधाण आले आहे.
अमरावती जिल्ह्याचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख हे विधानसभा निवडणूक अचलपूर मतदारसंघातून लढवत आले आहेत. मागील निवडणुकीत भाजप उमेदवाराचा आमदार बच्चू कडू यांनी पराभव केला होता. नेहमी सरकारविरोधात आंदोलन करणाऱ्या आमदार बच्चू कडू यांचा पराभव करण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनीच रणनीती आखल्याची चर्चा राजकीय पटलावर रंगत आहे.
आमदार बच्चू कडूविरोधात सक्षम उमेदवार म्हणून बबलू देशमुख यांना बघितले जाते. देशमुख यांना भाजपत घेऊन त्यांना अचलपूर मतदारसंघातून उमेदवारी देण्याचा प्रयत्न हा भाजपचा असू शकतो. कारण, शेतकऱ्यांना साले म्हणून संबोधणाऱ्या रावसाहेब दानवेविरोधात आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले होते. त्यामुळे आमदार बच्चू कडू व खासदार रावसाहेब दानवे यांच्यात मोठे राजकीय वैर निर्माण झाले आहे.
बबलू देशमुख यांना उमेदवारी देऊन बच्चू कडू यांचा पराभव करत वचपा काढण्यासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंची ही रणनीती असल्याचे सांगितले जाते. लोकसभा निवडणुकीचा निकाल लागताच काँग्रेसमधून भाजपमध्ये जाणाऱ्यांची संख्या वाढत असतानाच काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी भाजप नेत्यांशी केलेल्या चर्चेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने जिल्ह्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आले आहे.