अमरावती - परिस्थितीतीनुसार शहरातील अत्यावश्यक सेवेसोबतच इतर व्यावसायिक प्रतिष्ठाने सुरू करता येतील, असा निर्णय केंद्र शासनाने घेतला आहे. अमरावती शहरात सध्या कोरोनाग्रस्तांचा आकडा 16 वर गेला आहे. शहरातील गंभीर परिस्थिती पाहता केंद्र शासनाचा निर्णय अमरावतीत लागू होणार नसून 3 मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता अमरावती शहर बंदच राहणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली.
अमरावती महापालिका क्षेत्रात 27 एप्रिलपर्यंत केवळ औषधाचे दुकान सुरू राहणार असून भाजी विक्रीलाही बंदी आहे. 27 नंतर भाजी विक्रीबाबत निर्णय होईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले. शहरातील एकूण परिस्थिती पाहता अमरावती शहरात 3 मेपर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठलेही दुकाने उघडल्या जाणार नाही. तसेच किराणा खरेदीसाठी सकाळी 8 ते 12 इतकीच वेळ दिली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
शहरात सध्या कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने अत्यावश्यक सेवा वगळता इतर कुठलेही दुकान उघडणे धोकादायक आहे. यामुळे आमच्या संघटनेसोबतच सर्व व्यापारी संघटनांनी 3 मेपर्यंत आपले व्यवसाय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे मोबाईल फोन रिटेलर संघटनेचे अध्यक्ष बादल कुलकर्णी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.