अमरावती - जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व दुकाने, मॉल, हॉटेल, चहा नाष्टा गाड्या, बाजारपेठ, आदी आस्थापने रात्री आठ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिले आहेत. यानंतर आता अमरावतीतील प्रसिद्ध अंबा देवीचे मंदिरही दररोज रात्री साडेसात वाजताच बंद करण्याचा निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. रविवारी लॉकडाऊन असल्याने मंदिरही पूर्णतः बंद राहणार असल्याची माहितीही मंदिर प्रशासनाने दिली आहे.
आजपासून 36 तासांचा लॉकडाऊन -
अमरावती जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता लॉक डाऊन सुरू झाला आहे. शनीवारी रात्री आठपासून सोमवारी सकाळी आठ वाजेपर्यंत 36 तासांचा हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील दुकाने मॉल्स, हॉटेल हे रात्री आठ वाजेपर्यंत सुरू ठेवता येणार आहे. त्यामुळे आता अंबा देवीचे मंदिरही दररोज रात्री साडेसात वाजताच बंद होणार आहे.
भाविकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे -
अंबादेवीच्या मंदिरात दररोज हजारो भक्त दर्शन घेण्यासाठी येत असतात. मात्र, यामुळे कोरोनाचा फैलाव होऊ नये याची दक्षता घेत आजपासून मंदिर रात्री साडेसात वाजताच बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सोबतच मंदिरात येणाऱ्या भाविकांनी त्रिसूत्रीचे पालन करावे असे आवाहनही मंदिर प्रशासनाने येणाऱ्या भाविकांना केल आहे.
जिल्हाधिकाऱ्यांचा धर्मगुरूशी संवाद -
दरम्यान शनीवारी कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरजिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी आज शहरातील विविध धर्मगुरूंशी संवाद साधला यावेळी प्रार्थनास्थळी गर्दी टाळण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. तेव्हा कोरोना प्रतिबंधासाठी प्रशासनाच्या प्रयत्नांना साथ देण्याचा सर्व धर्मगुरूंनी एकमुखी निर्धार केला आहे.