अमरावती - जिल्ह्यातील 840 पैकी 553 ग्रामपंचायतींची निवडणूक 15 जानेवारीला होणार असून मतमोजणी 18 जानेवारीला होईल. कोरोनकाळात होणाऱ्या या निवडणुकीदरम्यान काय खबरदारी घ्यावी, यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्वे जारी केले असताना जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व तहसीलदार आणि पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या आहेत. विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाची निवडणूक नुकतीच पार पडली. निवडणूक यंत्रणेला कोरोनाकाळात निवडणूक प्रक्रियेचा अनुभव असला तरी ग्रामपंचायत निवडणुकीदरम्यान अधिक काळजी घेतली जाणार आहे.
प्रत्येक गावांशी येणार थेट संपर्क
शिक्षक मतदारसंघ निवडणुकीपेक्षा ग्रामपंचायत निवडणूक वेगळी आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत थेट प्रत्येक गावांशी संपर्क येणार असल्याने निवडणूक यंत्रणेत सहभागी सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह मतदान केंद्रांवर येणाऱ्या मतदारांच्या सुरक्षेची विशेष अशी काळजी घेतली जाणार आहे.
अशी घेतली जाणार काळजी
निवडणुकीशी संबंधित प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला मास्क परिधान करणे बंधनकारक आहे. यासह निवडणूक प्रक्रियेच्या जागेवर प्रवेश करताना सर्व व्यक्तींची तपासणी केली जाणार असून सॅनिटायझर, साबण आणि पाण्याची व्यवस्था केली असून सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जाणार आहे.
कोरोनासंक्रमित मतदारासाठी असा राहणार नियम
जे मतदार कोरोनासंक्रमित आहेत, त्यांना आरोग्य कर्मचाऱ्यांच्यासोबत मतदानाची वेळ संपण्याच्या अर्ध्यातास आधी प्रवेश दिला जाणार आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करून त्या व्यक्तीला मतदानाचा हक्क बजाविता येणार आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
- 23 ते 30 डिसेंबरपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारली जातील.
- 31 डिसेंबरला अर्जांची छाननी.
- 4 जानेवारीपर्यंत परत घेता येऊ शकतील नामनिर्देशन पत्र.
- 15 जानेवारीला सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30पर्यंत मतदान.
- 18 जानेवारीला मतमोजणी.