अमरावती - कोरोनामूळे देशात लॉकडाऊन आहे त्यामुळे हाताला काम नसल्याने अनेकांची उपासमार होत आहे. याचाच फटका मेळघाटातील हजारो आदिवासी कुटूंबाला बसला आहे. हाताला काम नसल्याने जगावे तरी कसे, असा प्रश्न निर्माण झाला असतानाच अमरावती मधील आधार फाऊंडेशने मेळघाटातील 300 गोरगरीब अदिवासी कुटूंबाना धान्य व किराणा व जीवनावश्यक वस्तूचे वाटप करून आधार दिला.
अमरावतीच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत हा उपक्रमाला सुरू करण्यात आला. या संकटकाळात आधार फाऊंडेशनचे हे मदतकार्य कौतुकास्पद असल्याचे पालकमंत्री यशोमती ठाकूर म्हणाल्या.
सध्याच्या लॉकडाऊन परिस्थितीची झळ सर्वसाधारण आदिवासी कुटुंबाना बसू नये या हेतूने आधार फाऊंडेशनतर्फे मदतीचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार दानदात्यांनी जवळपास 2 लाख 70 हजार रूपयांची मदत साहित्य, तसेच आर्थिक स्वरूपात केली.
फाऊंडेशनतर्फे मेळघाटातील रबांग, खिडकी, साबदाबाडी यासह आदी आदिवासी गावातील 300 कुटुंबांना मदतीचे वाटप करण्यात येत आहे,असे फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रदीप बाजड यांनी यावेळी सांगितले.