अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील ग्रामविकास अधिकाऱ्याला 40 हजारांची लाच घेताना एसीबीने अटक केली आहे. पळसखेड येथील एलईडी स्ट्रीट लाईटच्या कामाचे एमबी बुक अमरावतीच्या जिल्हा परिषद कार्यालयात पाठवणे व त्यानंतर चेक देणे, या कामासाठी पळसखेडच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने ४० हजार रुपयांची लाच मागितली होती. ती घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. प्रमोद नारायण चारथड असे लाचखोर ग्रामविकास अधिकाऱ्याचे नाव आहे.
हेही वाचा - अमरावती : राज्यात पहिल्यांदाच राष्ट्रीय पश्चिम विभागीय मलखांब स्पर्धा
अमरावतीच्या धामणगाव रेल्वे शहरातील रहिवासी असलेल्या एका तक्रारदाराने चांदूर रेल्वे तालुक्यातील पळसखेड येथे एलईडी स्ट्रीट लाईट लावण्याचे काम केले. या कामाचे एमबी बुक जिल्हा परिषद अमरावती येथे पाठवण्यासाठी व चेक काढून देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी प्रमोद नारायण चारथड यांनी एक लाख रुपयांची मागणी केली.
हेही वाचा - नागरिकत्व संशोधन विधेयकाला अमरावतीतील क्रांतिकारी स्मरण समितीचा विरोध
दरम्यान, तक्रारदाराने अमरावतीच्या लाचलुचपत विभागाकडे 25 सप्टेंबरला तक्रार केली होती. त्यांनी 7 ऑक्टोबरला शहानिशा केली होती. तर, बुधवारी सापळा रचून ही कारवाई करण्यात आली.