अमरावती - सातपुडा पर्वत रांगांच्या कुशीत वसलेल्या चिखलदरा तालुक्यातील कौलखेडा या बाजार गावातील जि.प. च्या शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढावी, शाळेत चैतन्य असावे, विद्यार्थी शाळेकडे ओढले जावेत या दृष्टीकोनातून विचार करत एका शिक्षकाने शाळेच्या इमारतीमधील रंगरंगोटीत बदल केले. ही शाळा एखाद्या रेल्वेप्रमाणे भासत असून या आगळ्यावेगळ्या प्रयोगामुळे शाळेतील विद्यार्थी संख्येतही भर पडला आहे.
अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील कौलखेडा या गावातील जिल्हा परिषद शाळा ही इतर शाळांप्रमाणेच होती. यामध्ये मुलांची संख्या वाढावी, शाळेत त्यांना रस वाटावा या उद्देशाने शिक्षक विचार करू लागले. युट्यूब आणि व्हाट्सअॅप च्या माध्यमातून त्यांना गुजरातमधील एका शाळेची वेगळ्या प्रकारे केलेली रंगरंगोटी बघायला मिळाली. त्यातूनच त्यांनाही एक भन्नाट कल्पना सुचली. त्यांनी शाळेच्या इमारतीचे रुप पालटण्याचे ठरविले, आणि सुचलेली कल्पना ग्राम पंचायतीपुढे मांडली. ग्रामपंचायतीने सभेमध्ये ही बाब मांडली आणि लगेच होकार देत शाळेच्या इमारतीत बदल करण्यासाठी होकार दिला. शाळेची रंगरंगोटीचा संपूर्ण खर्च ग्रामपंचायतीने उचलला आणि शाळेच्या इमारतीला रेल्वेचे रूप देण्यात आले.
या बदलाने शाळेत विद्यार्थ्यांची संख्या वाढली, मुलांबरोबर पालकांचीही शाळेबद्दलची ओढ वाढली. आता मुलांचे शाळेत रोज येण्याचे प्रमाण वाढले आहे. शिक्षकाच्या कल्पनेतून साकारलेली ही शाळा एखाद्या रेल्वेप्रमाणेच भासते. विद्यार्थ्यांना याचे फार आकर्षण असून शाळेतील विद्यार्थी संख्येत भर पडला आहे.
मेळघाट म्हटल की डोळ्यासमोर नेहमी कुपोषणाचे सावट पसरलेले दिसते. यातच शिक्षणव्यवस्थेचेही हालच आहे. जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या मुलांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चालले आहे. यातच अशा आगळ्यावेगळ्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शाळेकडे परत आणण्याचा ह्या उपक्रमातून शाळेने एक नविन उदाहरण सर्वांपुढे उभे केले आहे.