अमरावती - संपूर्ण जगभरात कोरोनाचे संकट ओढावले आहे. या संकट काळात डॉक्टर, परिचारिका, सरकारी यंत्रणा आणि पत्रकारांसह प्रत्येकजण आपापल्यापरिने मदत करत आहे. अमरावतीमध्ये पंक्चर दुरुस्ती करणाऱ्या व्यक्तिनेही आपला मदतीचा हात पुढे केला आहे. विनोद सुरुशे असे नाव असलेली ही व्यक्ती कोरोनासाठी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची वाहने मोफत दुरुस्त करुन देत आहे.
कोरोनामुळे अमरावती शहर लॉकडाऊन झाल्यानंतर विनोद सुरुशे यांनी आपले पंक्चर दुरुस्तीचे दुकान बंद केले. मात्र, काही कामानिमित्त बाहेर पडले असताना एक परिचारिका पंक्चर गाडी ढकलत नेताना त्यांना दिसली. सध्याच्या भीषण परिस्थितीत दिवसभर जिल्हा सामान्य रुग्णालयात सेवा देणाऱया त्या परिचारिकेला गाडी ढकलताना पाहिल्यानंतर विनोद सुरुशे यांनी आपले पंक्चर दुरुस्तीचे दुकान उघडले.
हेही वाचा - भारतात कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 हजारांच्या पुढे; 53 जणांचा मृत्यू
दुकानाजवळच्या खांबांवर कोरोनासाठी काम करणारे सर्व डॉक्टर, परिचारिका, पोलीस, पत्रकार, रस्त्यावर राहणाऱ्यांना जेवण देणाऱ्या सर्वांच्या गाडीत मोफत हवा भरून आणि पंक्चर मोफत दुरुस्त करुन दिले जाईल असा बोर्ड लावला. त्यांच्या या निर्णयाचे स्वागत पोलीस प्रशासनानेही केले असून, गर्दी होणार नाही अशी काळजी या पंक्चर दुरुस्ती दुकानावर घेतली जात आहे