अमरावती - गेल्या तीन दिवसांपासून ऊन्हाचा पारा ४६ डिग्रीच्यावर गेला आहे. त्यामुळे नागरिक उकाड्याने हैराण झाले आहेत. तिवसा तालुक्यातील डेहनी शिवारात एका ५८ वर्षीय गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना घडली. हा अमरावती जिल्ह्यातील उष्माघाताचा पहिला बळी आहे.
साहेबराव मोहोड (वय ५८) असे मृत गुराख्याचे नाव आहे. मोहोड नेहमीप्रमाणे जनावरे चारण्यासाठी गेले होते. मात्र उन्हाचा तडाखा जास्त असल्याने त्यांना त्रास झाला व त्यातच त्यांचा मृत्यू झाला. रानात एका झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळला. तिवसा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. तिवसा ग्रामीण रुग्णालयात त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.