अमरावती - राज्यात कोरोनाने कहर केला असून उपचाराअभावी अनेक लोकांचे प्राण जात आहेत. कोरोनावर उपचारासाठी कुठे बेड मिळत नाहीत, तर कुठे ऑक्सिजन उपलब्ध नाही, तर कुठे उपचाराची सोय नाही. त्यामुळे, कोरोनाबाधितांचे हाल होत आहेत. कोरोना काळात मागील एक वर्षांपासून जिवाची पर्वा न करता आरोग्य सेवक हे सेवा देत आहे. अशात मात्र आता अमरावतीच्या सुपर स्पेशालिटी रुग्णालयात कोरोनाबाधितावर लक्ष ठेवण्यासाठी कर्मचाऱ्याने पैसे मागितल्याचा गंभीर आरोप कोरोनाबाधित रुग्णाच्या नातेवाईक महिलेने केला आहे.
हेही वाचा - स्मशानभूमीसाठी मरमर आणि अंत्यविधीसाठी मारामार; अमरावतीत विदारक चित्र
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भेट दिली तेव्हा या महिलेने पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्याकडे आपली कैफियत मांडली. सुपर स्पेशालिटी रुग्णालयातील कर्मचारी हे कोरोनाबाधितांच्या नातेवाईकांना चांगल्या प्रकारचे मार्गदर्शन करत नसून आमच्या रुग्णाची माहिती देत नसल्याचा आरोपही या महिलेने केला आहे.
आरोप करणारी ही महिला तिवसा तालुक्यातील शेंदोळा या गावतील आहे. तिचे वडील हे कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार सुरू होता व त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. सुपर स्पेशालिटी रुग्णालयात सध्या शेकडो कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहे. बेड अभावी व ऑक्सिजन अभावी नागपूर, यवतमाळ, बुलडाणा अकोलासह आदी जिल्ह्यातील कोरोनाबाधितांवर येथे उपचार चालू आहे. दरम्यान, कोरोनाबाधिताच्या नातेवाईकाने केलेल्या या आरोपावर सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर हमणे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. असा कुठलाही प्रकार रुग्णालयात सुरू नसून, अशी कुठलीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झाली नसल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा - अमरावती : इतवारा बाजारात ग्राहकाची गर्दी; सोशल डिस्टंन्सिंगचा फज्जा