अमरावती - राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकींची तयारी सुरू झाली आहे. अमरावती जिल्ह्यात देखील 553 ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. येत्या 15 जानेवारीला या ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र, ग्रामपंचायत निवडणुकीच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील उमेदवार, कर्मचारी, अधिकारी अशा एकूण 95 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आला आहे. त्यामुळे निवडणूक यंत्रणेला धक्का पोहोचला असून ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये आता कोरोनाने शिरकाव केला आहे.
निवडणूक आयोगाने दिले होते तपासणीचे आदेश -
अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या उमेदवार अधिकारी-कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करणे सुरू आहे. आतापर्यंत 11 हजार 789 व्यक्तींची चाचणी करण्यात आली. असून त्यापैकी 95 जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधक उपाय योजना म्हणून या कोरोना चाचण्या करण्याचे निर्देश राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा प्रशासनाला दिले होते. त्यानुसार निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणारे उमेदवार ,निवडणूक यंत्रणेतील अधिकारी ,कर्मचारी, पोलीस अधिकारी, कर्मचारी या सर्वांची कोरोना तपासणी केली आहे.
तालुकानिहाय कोरोना रुग्ण -
यामध्ये अमरावती तालुक्यातील 18, भातकुली तालुक्यातील 4, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील 2, दर्यापूर तालुक्यातील 6, अंजनगाव तालुक्यातील 1, चांदुर रेल्वे तालुक्यातील 6, चांदुर बाजार 1, मोर्शी तालुक्यातील 3, वरुड तालुक्यातील 7, चिखलदरा तालुक्यातील 2 व्यक्तींचा समावेश आहे.
धारणी तालुक्यात सर्वाधिक 41 जणांना कोरोना -
अमरावती जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान कोरोनाची लागण झालेल्या 95 जणांपैकी सर्वाधिक 41 जण हे धारणी तालुक्यातील आहेत. इतर तालुक्यांच्या तुलनेत धारणीत कोरोनाबाधित जास्त आहेत.