अमरावती - जिल्ह्यातील 537 ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी घेण्यात आलेल्या निवडणुकीत सरासरी 80 टक्के मतदरांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील अकरही तालुक्यात एकूण 1हजार 958 मतदान केंद्रांवर मतदान प्रक्रिया उत्साहात आणि शांततेत पार पडली. एकूण 4 हजार 397 सदस्य पदांसाठी ही निवडणूक होत असून एकूण 11 हजार शासकीय मनुष्यबळ निबंडणूक प्रक्रियेत सहभागी झाले होते. सायंकाळी साडे पाच वाजता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली. 18 जानेवारीला मतमोजणी होणार आहे.
पोलिसांचा होता तगडा बंदोबस्त -
ग्रामपंचायत निवडणूक सुरळीत पार पडावी यासाठी ग्रामीण भागात पोलिसांचा तगडा बंदोबस्त होता. ग्रामीण भागात येणाऱ्या 31 पोलीस ठाण्यांतर्गत 2 पोलीस उपअधीक्षक, 6 सहायक पोलीस निरीक्षक,15 पोलीस निरीक्षक,102 पोलीस उपनिरीक्षक, 1 हजार 564 पोलीस शिपाई, 1 हजार 246 होमगार्ड राज्य राखीव पोलीस दलाची एक तुकडी, 73 पोलीस वाहन, 31 पेट्रोलिंग सेक्टर, 18 चेकपॉइंट असा तगडा बंदोबस्त होता. पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत येणाऱ्या 60 ग्रामपंचायतींसाठी पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या मार्गदर्शनात 3 पोलीस उपायुक्त, 3 सहायक पोलिस आयुक्त, 12 पोलीस निरीक्षक, 41 सहायक पोलिस निरीक्षक, 604 पोलीस अंमलदार, 125 होमगार्ड, दोन दंग निरीक्षक पथक, एक शीघ्र कृती दल सज्ज होते.
संवेदनशील मतदान केंद्रांवरही शांततेत मतदान -
जिल्ह्यात एकूण 128 मतदान केंद्र ही संवेदनशील म्हणून घोषीत करण्यात आली हाती. यामध्ये मोर्शी तालुक्यात 8, वरुड तालुक्यात 16, चांदुर बाजार तालुक्यात 18, अचलपूर तालुक्यात 24, धारणी तालुक्यात 2, चिखलदरा मध्ये 4, अंजनगाव सुर्जी तालुक्यात 13, दर्यापूरमध्ये 6, धामणगाव रेल्वेत 20, चांदुर रेल्वेत 7, तिवसा तालुक्यात 2, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 13, अमरावतीत 2 आणि भातकुली येथील 1 मतदान केंद्राचा समावेश होता. तुरळक घटना वागळता संवेदनशील भागात मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली.
मतदान केंद्रांवर आरोग्य तपासणी -
प्रत्येक मतदान केंद्रावर कोविड दक्षतेअंतर्गत मतदारांचे तापमान मोजून आरोग्य चाचणी करण्यात आली. मतदानासाठी मतदान केंद्रांवर सकाळपासूनच गर्दी उसळी होती.
18ला होणार मतमोजणी -
ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल 18 जानेवारीला लागणार आहे. जिल्ह्यातील चौदा तहसील कार्यालयांमध्ये मतमोजणी केली जाणार आहे.
477 सदस्य बिनविरोध -
एकच अर्ज आल्याने एकूण 477 सदस्य हे बिनविरोध निवडून आले आहेत. यामध्ये अमरावती तालुक्याती 30, भातकुली तालुक्यात 42, नांदगाव खंडेश्वर तालुक्यात 56, दर्यापूर तालुक्यात 22, अंजनगाव सुर्जी तालुक्यात 32, तिवसा तालुक्यात 15, चांदुर रेल्वे तालुक्यात 16, धामणगाव रेल्वे तालुक्यात 29, अचलपूर तालुक्यात 57, चंदूरबाजार तालुक्यात 41, मोर्शी तालुक्यात 42, वरुड तालुक्यात 14, धरणी तालुक्यात 46 आणि चिखलदरा तालुक्यात 35 सदस्य अविरोध निवडून आले आहे.