अमरावती- मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात आणल्या जाणाऱ्या तब्बल ६२ गोवंशाची सुटका करण्यात आली आहे. शिरजगाव कसबा पोलिसांनी महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवर असलेल्या आडना नदीच्या पुलावर रविवारी ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत एकूण ३१ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोवंश कायद्यानुसार करण्यात आलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
शिरजगाव कसबा पोलीस स्टेशनचे ठाणेदार पंकज दाभाडे यांना गोवंशाची एका कंटनेरमधून अवैध वाहतूक केली जात असल्याची माहिती मिळाली होती. प्राप्त माहितीनुसार पोलीस पथकाने मध्यप्रदेश सीमेवर आडना नदीवरील पुलावर सापळा लावला. त्यावेळी मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या हद्दीत एक दहाचाकी कंटेनर आला. त्यावेळी पोलिसांनी त्याला अडवून त्याची तपासणी केली असता, आतमध्ये निर्दयीपणे जनावरे कोंबून भरल्याचे आढळून आले. त्याचवेळी पोलिसांनी अचानक तपसणी सुरू केल्याने अवैध काम करणारे कंटनेर चालक आणि मालक या दोघांनीही घटनास्थळावर पळ काढला.
या कारवाईतील 62 जनावरांची एकूण किंमत 9लाख 30 हजार रुपये तर कंटेनर ची किंमत 22 लाख रुपये कंटेनर क्र RJ ll - GA-3517 असा एकूण 31 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. जनावरांना कंटेनर मधून उतरवून रासेगाव येथील गोरक्षना मध्ये ठेवण्यात आले आहे. तर जप्त केलेला कंटेनर शिरजगाव पोलीस स्टेशनला लावण्यात आला आहे.
मध्यप्रदेश सीमेवरून नेहमीच गोवंशाची अशाप्रकारे वाहतूक होत असते ही वाहतूक राजस्थान मध्यप्रदेशातून महाराष्ट्रात बिनबोभाट होत असल्यामुळे राजस्थान व मध्यप्रदेश पोलीस विभागावर संशय व्यक्त होत आहे. ही धडक कारवाई ठाणेदार पंकज दाभाडे यांच्यासह न.पो. का. पुरुषोत्तम माकोडे, अंकुश अरबट, राहुल खर्चना,व इतरांनी केली.