अमरावती - शहरासह जिल्ह्यात कोरोनाच्या संकटाकडे सर्वसामन्य नागरिकांसह प्रशासन आता हवे तितके गांभीर्य दाखवत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढून 390 झाली आहे. सध्या अमरावती शहराचाच भाग असलेले बडनेरा हे कोरोनामय झाले आहे. बडनेरा शहरात 49 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याने या शहरातील नागरिकांमध्ये भय वाढले आहे.
जुनी वस्ती आणि नवी वस्ती आशा दोन भागात पसरलेल्या बडनेरा शहरातील सर्व मुख्य चौक आणि परिसर हे प्रतिबंधित क्षेत्र घोषीत करण्यात आले आहे. माळीपुरा, कंपासपुरा, चमननगर, चावडी चौक, पिंपरी रोड असा संपूर्ण बडनेरा जुनी वस्ती परिसर कोरोनामय झाला आहे. बडनेरा नवी वस्तीमध्ये येणारे हॉकी मैदान परिसर, लड्डा प्लॉट, जयस्तंभ चौक, मारवाडी पुरा, कुरेशी नगर या भागातही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
गेल्या काही दिवसापासून अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना रुग्ण हे बडनेरा शहरात निघत आहेत. 1 जून ते 18 जून या 18 दिवसात बडनेरामध्ये एकूण 27 जणांना कोरोना झाला आहे.
बडनेरा शहराचा 80 टक्के भाग हा दाटीवाटीचा असून जुन्या वस्तीत सायंकाळपासून रात्री उशिरापर्यंत चौकात युवक घोळक्याने बसून गप्पा गोष्टी करण्याचा प्रकार लॉकडाऊनच्या काळातही सुरू असल्याचे परिसरातील लोकांचे म्हणणे आहे.
जुनी वस्ती परिसरात 1 जूनपासून ज्यांना कोरोना झाला त्यामध्ये 18 ते 28 वर्ष वयोगटातील युवकांना कोरोना झाल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. जुन्या वस्तीत माजी नगरसेवकाच्या कुटुंबात एकूण 6 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. नव्या वस्तीत प्रसिद्ध असणाऱ्या औषधीचे दुकान चालविणाऱ्या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यावर त्याच्या कुटुंबात आणखी एकाला कोरोना झाला आहे.
अमरावती महापालिकेच्या क्षेत्रात येणाऱ्या बडनेरा शहरातील सर्व 8 नगरसेवकांनी बडनेरा शहरात सक्तीने लॉकडाऊन करण्यात यावा, अशी मागणी महापालिका आणि जिल्हा प्रशासनाकडे केली आहे. बडनेरा परिसरात कोरोनाचा उद्रेक होण्याची भिती वाढली आहे. यामुळे काही दिवस बडनेरा बंद करणे हाच उपाय योग्य असल्याचे बडनेरा नवी वस्ती प्रभागाचे नगरसेवक प्रकाश बनसोड 'ईटीव्ही भारत' शी बोलताना म्हणाले.
एकूणच बडनेरा शहराची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. बडनेरा हे कोरोनाचे हॉटस्पॉट बनले असून बडनेरा शहरातील कोरोना आटोक्यात आला नाही तर बडनेरा शहराची परिस्थिती हाताबाहेर जाऊन याचे गंभीर परिणाम अमरावती शहरातही उमटण्याची भीती आहे.