अमरावती - जिल्ह्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या मेळघाटातील चिखलदरा-धारणी या दोन तालुक्यात तीन महिन्यांत तबल 49 बालकांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आल्यानंतर आता भाजप आमदार प्रताप अडसड यांनी आरोग्य यंत्रणेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. बालमृत्यूला रोखण्यासाठी अपयशी ठरलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी भाजप आमदार प्रताप अडसड यांनी केली आहे. सोबतच प्रशासनदेखील योजना व्यवस्थित राबवत नसल्याचा आरोप आमदार प्रताप अडसड यांनी केला आहे.
काय आहे प्रकरण -
मेळघाटात मागील तीन महिन्यांत तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर एप्रिल 2020 ते मार्च 2021 या एक वर्षाच्या कालावधीत मेळघाटातील तब्बल 213 बालमृत्यू व 10 मातांच्या मृत्यूची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. बालमृत्यूचे प्रमाण रोखण्यासाठी सरकारकडून कोट्यवधी रुपये आरोग्य यंत्रणेवर खर्च करत आहे. मात्र, अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात मागील तीन महिन्यांत तब्बल 49 बालकांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार मृत बालकांमध्ये 29 दिवस ते एक वर्षापर्यंतच्या 17 बालकांचा समावेश आहे.
'बालरोग तज्ज्ञ पाठवण्यात सरकार अपयशी' -
मेळघाटमध्ये आरोग्य यंत्रणा सक्रिय असल्याचा कितीही गाजावाजा होत असला तरी आकडे मात्र हे वस्तुस्थिती सांगणारे आहे. धारणी आणि चिखलदरा या दोन तालुक्यांमध्ये आदिवासी बहुल मेळघाटात एकूण 322 गावे आहे. हा भाग कुपोषित बालके, बालमृत्यू आणि मातामृत्यू यासाठी नेहमीच चर्चेत असतो. दरम्यान, गंभीर परिस्थिती असतानाही मेळघाटात बालरोग तज्ज्ञ पाठवण्यात सरकार अपयशी ठरल्याचा आरोप गाभा समितीचे सदस्य बंड्या साने यांनी केला आहे.
मेळघाटात वर्षभरात 213 बालमृत्यूंची नोंद -
एप्रिल 2020 ते मार्च 2021 या एक वर्षाच्या कालावधीत मेळघाटमधील तब्बल 213 बालमृत्यूंची नोंद आरोग्य विभागाकडे झाली आहे. तर 10 मातांचा मृत्यूही झाला आहे. यामध्ये पावसाळ्यात कमी वजनाचे बाळ, जंतुसंसर्ग, श्वसन, कमी तापमान, जन्मजात व्यंगत्व इतर कारणे असल्याचेही आरोग्य विभागाचे म्हणने आहे.