अमरावती - तिवसा शहराचे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे भाडेतत्वावर राहत असलेल्या येथील पंचवटी चौकालगत असलेल्या घरी काल मध्यरात्री चोरट्यांनी हात साफ करत २५ हजार रोख रकम व इतर वस्तू लंपास केल्याची घटना आज सकाळी उशिरा उघडकीस आली आहे. शहराच्या पंचवटी चौकात पोलिसांची नेहमीच गस्त असतानाही चोरीची घटना घडल्याने अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
मुख्य दाराची कडी तोडून आत प्रवेश
आठवड्याभराआधी वैभव वानखडे यांच्या आजीचे निधन झाल्याने त्यांच्या दुसऱ्या घरी दसव्याच्या कार्यक्रमाचे नियोजन सुरू असल्याने सहकुटुंब पंचवटी येथील घराला टाळे ठोकून वडिलांच्या घरी मुक्कामी होते, याचाच फायदा घेत अज्ञात भुरट्या चोरट्यांनी वानखडे यांच्या घराला लक्ष केले. शहराच्या पंचवटी चौक ते कुऱ्हा मार्ग लागतच वैभव वानखडे यांचे घर आहे. मध्यरात्री दोन ते तीनच्या सुमारास काही चोरट्यांनी मुख्य दाराची कडी तोडून घरात प्रवेश केला व घरातील वस्तू अस्ताव्यस्त फेकून रोख रक्कम २५ हजार, एक अंगठी व गोप यासह विहिरीतील मोटर पंप चोरून नेले.
पोलिसांनी केला पंचनामा
ही घटना आज सकाळी उघडकीस आल्याने शहरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती तिवसा पोलिसांना मिळताच पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून अमरावती स्थानिक गुन्हे शाखेचे पथक दाखल झाले होते. तर पुढील तपास पोलीस करीत आहेत.