अमरावती - गेल्या अनेक वर्षापासून तिवसा शहरातील पंचवटी चौकात भटक्या जमातीचे 25 कुटुंब वास्तव्यास आहेत. कोरोना विषाणूमुळे त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली असल्याने या कुटुंबाना शहरातील काही सामाजिक संस्थांनी व प्रशासकीय यंत्रणेनी अन्नधान्याची मदत केली. मात्र, या कुटुंबाने शासनाकडे रेशनकार्डची मागणी केली होती. त्यानंतर या कुटुंबीयांची मागणी लक्षात घेत तिवसा तहसीलदार यांनी पुरवठा निरीक्षक यांना तत्काळ या सर्व कुटुंबाना शिधापत्रिका देण्याचे आदेश दिले. नंतर, यातील 18 कुटुंबाना मंगळवारी शिधापत्रिकेचे वाटप करण्यात आले.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत राज्यातील लॉकडाऊनची तारीख आता तीन मेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे आता अनेकांना मोठया अडचणीला समोर जावे लागणार आहे. या परिस्थितीमध्ये सर्वांची व्यवस्था प्रशासनाकडून केली जात असून वेळोवेळी प्रशासन अन्नधान्य पोचवण्याचे काम करत आहे. तिवसा येथील पंचवटी चौकात राहत असलेल्या भटक्या जमातीच्या कुटुंबातील लोकांचे हातावर पोट असल्यामुळे लॉकडाऊनमुळे त्यांना दोन वेळचे जेवण मिळणे कठीण झाले होते. त्यामुळे या कुटुंबियांनी शासनाला रेशनकार्डची मागणी केली होती. ही मागणी लक्षात घेत पुरवठा विभागाकडून सर्वांचे सर्वेक्षण करून यातील 18 कुटुंबाना तात्पुरत्या स्वरुपाच्या शिधापत्रिका देऊन तातडीने सर्वांना रेशन देण्याचे आदेश यावेळी देण्यात आले.