अमरावती- नागपूर-औरंगाबाद महामार्ग हा जीवघेण्या खड्ड्यांची समृद्धी असलेला महामार्ग बनला आहे. मागील ९ वर्षात या महामार्गावरील खड्ड्यांनी तब्बल १७३ बळी घेतले आहेत. हजारो कोटी रुपये खर्च करून समृद्धी महामार्ग तयार होत आहे. मात्र वाहतूक सुरू असलेल्या महामार्गावरील खड्डे भरायला सरकारकडे पैसे नाही का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
जिल्ह्याच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील घुई खेडवरून नागपूर - औरंगाबाद महामार्ग जातो. येथून चांदूर रेल्वे तालुक्यातील धोत्रा येथील मुळचे असलेले व सद्या नागपूरमधील गोटाळ पांजरी, कस्तूरी नगर येथे वास्तव्यास असलेले अनिल सारंगधर चेंडकापुरे हे रविवारी आपल्या आई, पत्नी, मुली, वडिल व सासऱ्यांसोबत नागपूरवरून घुईखेडकडे आल्टो कार (क्र. एमएच ४९ यु ३४०९) ने प्रवास करित होते. दरम्यान घुईखेड जवळील खारवगळ नाल्याजवळ टाटा मोटर्स कंपनीच्या ट्रक (क्र. एमएच १७ बीडी ९७४३) विरूद्ध दिशेने येत होता. दरम्यान या दोन्ही वाहनांची समोरासमोर जोरदार धडक झाली. यामध्ये चौघांचा मृत्यू झाला असून दोघे जण गंभीर जखमी झाले. सदर अपघात खड्डे वाचविण्याच्या नादात झाल्याचे काहींनी सांगितले. त्यामुळे या मार्गावरील खड्ड्यांचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला.
खड्ड्यांमुळे होत असलेल्या अपघातांबाबत अनेकांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मात्र प्रशासनाचे त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने खड्ड्यांमुळे अनेकांना आपला जिव गमवावा लागत आहे. सदरील कामाकडे संबंधित अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असून या अपघाताला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी जि. प. सदस्य प्रविण घुईखेडकर यांनी जिल्हाधिकारी यांना निवेदन देऊन केली आहे.