अमरावती - भारताचे पाहिले कृषिमंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांना भारतरत्न द्यावा या मागणीसाठी 1500 विद्यार्थ्यांनी तब्बल तीन हजार फुटांचे पत्र लिहले आहे. नांदगांव खंडेश्वर येथील नांदगाव हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त हा उपक्रम राबवला.
विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी या तीनही भाषांमध्ये हे पत्र लिहले आहे. त्यांच्या मनात भाऊसाहेबांप्रती असलेल्या भावना या चिमुकल्यांनी आपल्या लिखानातून व्यक्त केल्या. श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांच्या हस्ते प्राचार्या सुहासिनी शेंडे यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत या पत्राचे अनावरण करण्यात आले.
डॉ. पंजाबराव देशमुख यांच्यासारख्या महान व्यक्तीमत्वाला देशातील सर्वोच्च सन्मान मिळावा यासाठी चिमुकल्यांनी हे पाऊल उचलले आहे. असे उपक्रम इतर शिक्षण संस्थांमध्येही राबवले जावेत. डॉ. पंजाबराव देशमुख यांचे सर्वच क्षेत्रातील कार्य अतुलनीय असून मुलांच्या भावना केंद्र सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासन श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे कोषाध्यक्ष दिलीप इंगोले यांनी यावेळी दिले आहे.