अमरावती - आपल्याभोवती वृक्षवल्ली नव्याने बहरावी, यासाठी प्रत्येकाने एक झाड लावावे, त्याचे संवर्धन करावे या उद्देशाने अमरावतीच्या दिशा फाउंडेशनने पुढाकार घेतला आहे. अनेकांच्या प्रयत्नातून यावर्षी पावसापूर्वी किमान १ हजार झाडं लावून ती वाढवण्याचा संकल्प करण्यात आला आहे. या संकल्पपूर्तीसाठी तपोवन परिसरातील वृक्षप्रेमी सकाळी अडीच तीन तास श्रमदान करत आहेत.
निसर्गाने आपल्याला भरभरून दिलं आहे. आता आपणही निसर्गासाठी काही करायला हवं या उद्देशाने अमरावतीत दिशा फाउंडेशनच्यावतीने गत 5 वर्षांपासून वृक्ष लागवड आणि संवर्धनाचे काम सुरू आहे. ' एक झाड माझं' असे या मोहिमेला नाव देण्यात आले आहे. मोहिमेच्या सुरुवातीच्या वर्षात एक दोघे या मोहिमेत सहभागी होते. आज मात्र, विविध क्षेत्र अनेक शासकीय कार्यालय तसेच विविध पेशातील वृक्षप्रेमींना आपलं एक झाड लावाव ते जगवाव याची ओढ लागली आहे. शिवाजीराव उपाख्य, दाजीसाहेब पटवर्धन यांनी कुष्ठरोग्यांच्या उत्थानासाठी निर्माण केलेल्या तपोवन परिसरात गत दोन वर्षांपासून ही मोहीम राबविण्यात येत आहे.
मागील वर्षी तापोवन परिसरात वड, पिंपळ, चिंच आशा विविध प्रजातींची एकूण 500 झाड लावण्यात आली होती. यापैकी 50 टक्के झाडं जंगली असून, ती आता बहरली असल्याचे दिशा फाउंडेशनचे प्रमुख यादव तरटे 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. यावर्षी तापोवन परिसरात 1 हजार वृक्ष लागवडीचा आमचा संकल्प आहे. यासाठी सध्या खड्डे खोदण्याची मोहीम सुरू आहे. पाच दिवसात साडेतीनशेच्या आसपास खड्डे खोदून झाले आहेत. यावर्षी या मोहिमेत अनेकांनी सहभाग घेतला आहे. यामध्ये जीएसटी विभाग, महसूल विभाग आशा शासकीय खात्यातील अधिकारी आणि कर्मचार्यांचाही सहभाग आहे.
या कामात काही वकीलमित्र, डॉक्टर, उद्योजक, विद्यार्थी असे सगळ्याच क्षेत्रात असणारे वृक्षप्रेमी सोबत आले आहेत. आता तीन चार दिवसात आम्ही हजार खड्डे खोदू. यापैकी काही खड्डे मागच्या वर्षीचे आहेत. त्यांची उकरी करण्यात येत आहे. वन विभागाच्यावतीने आम्हला यावर्षीही वड, पिंपळ, आंबा, चिंच, कडूनिंब अशी वेगगवेगळ्या प्रजातींची रोप मिळणार आहेत. ती सर्व रोप आम्ही या तापोवन परिसरात लावणार आहोत. आता पाऊस सुरू होणार आहे. हीच वृक्ष लागवडीची योग्य वेळ आहे. त्यामुळे आम्ही लावलेली झाडं याभागात नक्कीच बहरतील असा आम्हला विश्वास आहे. यावर्षी अर्ध्यापेक्षा अधिक झाडं जगवणार आहोत. आपल्याला सर्व काही देणाऱ्या निसर्गासाठी आपण थोडफार काही करतो आहोत. याचा एक वेगळाच आनंद आहे. या आनंदात सहभागी होण्यासाठी अमरावतीकारांनी मोठया संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन देखील यादव तरटे यांनी केले.