अमरावती - जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील एका समुहावर गावातील दुसरा समूह अत्याचार करीत असल्याची घटना घडली आहे. त्यांच्या निषेधार्थ दानापूर येथील शंभर जणांनी शुक्रवारी सकाळी गाव सोडले असून त्यांचा मुक्काम गावालगतच्या पाझर तलावावर असून ते गावात परतणार नाहीत. त्यांच्या मालमत्तेच्या संरक्षणाची जबाबदारी प्रशासनाची राहील, असे त्यांनी लेखी कळविले आहे.
वहीवाटीचा रस्ता केला बंद
अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे तालुक्यातील दानापूर येथील या बांधवांची दानापूर शेत शिवारात शेती आहे. याच शिवारात मुख्य सरकारी पांदनच्या एक शेतापलीकडे यांची शेती आहे. मात्र गावातील काहीजणांनी या समुहास त्यांच्या शेतात जाणारा पिढीजात वहीवाटीचा रस्ताच बंद केला. त्यामुळे त्यांची मशागत व इतर शेती कामे खोळंबली. ऐन पेरणीच्या वेळी ट्रॅक्टर अडवला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंबंधीची तक्रारही दाखल करण्यात आली, मात्र प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप या समुहाने केला आहे.
'गुन्हे दाखल मात्र कारवाई नाही'
गुन्हे दाखल झाले असले तरी कारवाई काहीच झालेली नाही. याविरुद्ध दानापुरातील दहाजण गावात आमरण उपोषणाला बसले होते. त्यानंतर चांदूरच्या एसडीपीओंनी कार्यवाही केली. मात्र रस्ता अडवणूक प्रकरणात गुन्हे दाखल झालेले आरोपी अद्यापही मोकाट आहेत, असे तक्रारदारांचे म्हणणे आहे. वहीवाटीच्या रस्त्यासाठी स्थानिक तहसीलदाराकडे २३/०७/२१ दाखल केसवर चार महिने होऊनही निकाल लागलेला नाही. सततचा अन्याय, अत्याचार होऊनही न्याय मिळत नसल्याने दानापुरातील हे ग्रामस्थ व्यथीत झाले आहेत.