अकोला - शिक्षकांच्या समस्या जिल्हा परिषद प्रशासनाने १० फेब्रुवारीपर्यंत सोडवाव्यात. अन्यथा ११ फेब्रुवारीला सीईओंच्या कक्षात जावून तोडफोड करून सीईओंची खुर्ची पोलिसांच्या ताब्यात देऊ, असा इशारा आमदार देशपांडेंनी जिल्हा परिषदेत सोमवारी ठिय्या आंदोलनादरम्यान दिला. यावेळी उपस्थित अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे यांनी प्रशासनाची बाजू मांडली व शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी शिक्षक आमदार श्रीकांत देशपांडे यांनी शिक्षक संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन संध्याकाळी ५.५५ वाजता जिल्हा परिषदेत धाव घेतली. आमदारांच्या पोहोचण्यापूर्वीच मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) कैलास पगारे यांच्या कक्षाकडे जाणाऱ्या गेटला पोलिसांच्या पुढाकाराने जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी कुलूप लावले. त्यामुळे आमदार व शिक्षकांनी सीईओंच्या कक्षाखाली ठिय्या आंदोलन केले. परंतु, काही वेळानंतर अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विलास खिल्लारे जिल्हा परिषदेत आले. त्यांनी दहा फेब्रुवारीपर्यंत शिक्षकांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन आमदार देशपांडे व शिक्षकांना दिले. मात्र, त्यानंतर सुद्धा संबंधित समस्या न सुटल्यास ११ फेब्रुवारीला सीईओंच्या कक्षात जाऊन तोडफोड करू व सीईओंची खुर्ची प्रशासनाच्या ताब्यात देऊ, अशा इशारा आमदार देशपांडे यांनी यावेळी दिला.
विषय शिक्षक नियुक्तीचे आदेश व आपसी बदल्यांचे आदेश सीईओंच्या स्वाक्षरीसाठी मुंबईला पाठवण्यात येतील, असे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी खिल्लारे यांनी यावेळी सांगितले. याव्यतिरीक्त पती-पत्नी एकत्रिकरणाची प्रक्रिया सुद्धा १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आश्वासन अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले. त्यामुळे आमदार देशपांडे व उपस्थित शिक्षकांनी जिल्हा परिषद प्रशासनाला सोमवारपर्यंत समस्या मार्गी लावण्याची ‘डेडलाईन’ दिली. आंदोलनादरम्यान शिवसेनेचे जिल्हा प्रमुख नितीन देशमुख व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या.