अकोला - गंगानगर येथील युवक हा त्याच्या दोन मित्रांसह दगडपारवा धरणात पोहण्यासाठी आज दुपारी उतरला होता. त्यातील एक युवक आतमध्ये गेला. तो वरती येऊच शकला नाही. त्याला बाहेर काढण्यासाठी संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाने त्याचा अवघ्या काही मिनिटात मृतदेह बाहेर काढला. शेख दानिश शेख नईम असे मृत युवकाचे नाव आहे.
शेख दानिश हा त्याचे दोन मित्र यांच्यासोबत दगडपारवा धरणावर पोहण्यासाठी आला होता. शेख दानिश हा मित्रांसोबत पाण्यात उतरला. तो आतमध्ये गेल्याने त्याला बाहेर येता आले नाही. त्याचे मित्रही त्याला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करीत होते. तो पाण्यात दिसेनासा झाल्याने त्यांनी आरडाओरड केली. ग्रामस्थांनी धाव घेत बार्शीटाकळी पोलिसांना माहिती दिली. संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे दीपक सदाफळे यांना माहिती देण्यात आली. त्यांनी त्यांचे सहकारी उमेश बिल्लेवार, सागर आटेकर, अंकुश सदाफळे, धिरज राऊत, मयुर कळसकार, सुरज ठाकुर, ओम साबळे, मयुर सळेदार, शिवम वानखडे यांना सोबत घेऊन घटनास्थळी पोहोचले. लगेच त्यांच्या पथकाने धरणात शोध मोहीम राबविली. अवघ्या काही मिनिटांतच शेख दानिश याचा शोध लावून त्याचा मृतदेह बाहेर काढला. यावेळी घटनास्थळी बार्शीटाकळीचे ठाणेदार तिरुपती राणे आणि पोलीस कर्मचारी उपस्थित होते.