अकोला - अकोट तालुक्यातील पणज वडाळी येथील देशमुख रस्त्यावर शहापूर ब्रहुट धरण आहे. या धरणात वडाळी देशमुख येथील शुभम अजाबराव फुकट हा पोहायला गेला होता. मात्र, तो या धरणाच्या पाण्यात बुडाला. आज त्याचा मृतदेह धरणातून बाहेर काढण्यात संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला यश आले आहे.
शुभम आपल्या मित्रांसोबत ब्रहुट प्रकल्प धरणात पोहायला गेला होता. त्याला पाण्याच्या खोलीचा अंदाज न लागल्याने तो बुडाला. यावेळी गावातील लोकांना शुभमचे कपडे व जोडे काठावर आढळले. त्यामुळे गावातील नागरिकांकडून शोधकार्य सुरू झाले. त्याचा शोध न लागल्याने संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाला पाचारण करण्यात आले. पथक प्रमुख दीपक सदाफळे आणी त्यांचा पथकातील उल्हास आटेकर, विकी साटोटे, ऋषीकेश तायडे, अंकुश सदाफळे, आशिष उगले, राहुल जवके, महेश साबळे, योगेश उगले, सुरज ठाकूर, निखील ठाकरे, मयूर सळेदार, मयूर कळसकर, गोविंदा ढोके, शाम वानखडे, आकाश खाडे, शे. ईरफान, विकी बुलबुले यांनी शुभमचा शोध घेण्यास सुरुवात केली.
यावेळी धरणात ५५-६० फूट खोल पाणी होते. त्याचबरोबर, धरणाच्या मध्यभागी हनुमानाचे मंदीर असून ते बुडालेले होते. एक मोठे वडाचे झाड व एक विहीर होती. त्यामुळे शोध कार्यात अडथळा निर्माण झाला होता. मात्र बचाव पथकाने रेस्क्यू बोट व रॅम्पद्वारे अंडर वॉटर सर्च ऑपरेशन राबवून शेवटी मृतदेह शोधून काढला. यावेळी संपूर्ण शोधकार्याबद्दलची माहिती बचाव पथक प्रमुख दीपक सदाफळे यांनी दिली.