अकोला - थुंकण्याच्या कारणावरून एका युवकाची हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी दुपारी घडली आहे. ऐन दिवाळीच्या दिवशी अकोट शहरात घडलेल्या या घटनेने शहरात एकच खळबळ उडाली आहे. रोहित मोरे असे मृत युवकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी विकी तेलगोटे याला अकोट शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
अकोट शहरातील खानापूर वेस परिसरात विक्की तेलगोटे हा एका ठिकाणी थुंकला असता, रोहित मोरे याने त्याला विरोध केला. यावरून त्यांच्यात वाद झाला. मात्र हा वाद एवढा विकोपाला गेला की, विक्कीने त्याच्याजवळ असलेल्या भाल्याच्या साह्याने रोहितच्या छातीवर वार केले. त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी तत्काळ अकोला येथे नेण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी मारेकरी विक्की तेलगोटे यास ताब्यात घेतले असल्याची माहितची सूत्रांनी दिली.