अकोला - अकोला तालुक्यातील निपाणा येथील तरुण शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना रविवारी सकाळी उघडकीस आली. गजानन महादेव राऊत असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
गजानन राऊत यांच्याकडे शेती असून ते कुटुंब प्रमुख आहेत. दोन चिमुकली मुले, पत्नी आणि आई असा त्यांचा परिवार आहे. यावर्षी त्यांनी आपल्या शेतात सोयाबीनची पेरणी केली. अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिकाची वाढ खुंटली. शनिवारी पाऊस पडल्यानंतर रविवारी सकाळी शेतातील पीक पाहण्यासाठी जात असल्याचे सांगून गजानन राऊत घरून निघाले. सकाळपासून गेलेले गजानन राऊत घरी परत आले नाही. त्यामुळे त्यांची पत्नी त्यांना पाहण्यासाठी शेतात गेली. तेथे विहिरीत त्यांचा मृतदेह लटकलेल्या स्थितीत आढळून आला. गावात वार्ता पसरताच गावकऱ्यांनी शेताकडे धाव घेतली.
बोरगाव मंजू पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. गजानन राऊत यांच्यावर बँकेचे कर्ज असल्याचे समजते. पीक परिस्थितीमुळे ते विवंचनेत होते, अशी माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली. राऊत कुटुंबियांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी गावकऱ्यांनी केलेली आहे. ठाणेदार हरिश गवळी पुढील तपास करीत आहेत.