अकोला - सिंधी कॅम्प येथील हार्डवेअर व्यावसायिक आदर्श कॉलनीजवळील भरलेल्या खदानीत उडी घेऊन शुक्रवारी आत्महत्या केली. संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाकडून या युवकाच्या मृतदेहाचा शोध सुरू आहे. आजचा दुसरा दिवस असून या खदानीत मृतदेह मिळून आला नाही. मोहन जसुजा, असे आत्महत्या करणाऱ्या युवकाचे नाव आहे.
मोहन जसुजा हे शुक्रवारी दुपारी त्यांची दुचाकी (एमएच ३० एक्स ७२१८) ने खदानीजवळ आले. त्यांनी दुचाकी उभी करून व बाजूला चप्पल काढून खदानीच्या पाण्यात उडी घेवून आत्महत्येचा प्रयत्न केला. परिसरातील नागरिकांनी त्यांना उडी घेताना पाहिले, त्यांनी पोलिसांना तत्काळ फोन करून या घटनेची माहिती दिली. मोहन जसुजा यांचा मृतदेह काढण्यासाठी पिजर येथील सत गाडगे बाबा आपत्कालीन पथकाला पाचारण करण्यात आले.
शुक्रवारी सायंकाळपासून हे पथक मोहन जसुजा यांच्या मृतदेहाचा खदानीत शोध घेत आहेत. या पथकाचा आजचा दुसरा दिवस होता. सायंकाळपर्यंत त्यांचा मृतदेह मिळून आला नाही. विशेष म्हणजे, मोहन जसुजा यांच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी पथकांनी सकाळी ६ पासून खदानीत शोध घेत आहेत. दरम्यान, पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे व त्यांचे सहकारी खदानीच्या खोल पाण्यात नावेद्वारे शोध घेत आहेत. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी होत आहे. तसेच खदान पोलिसांचे एक पथक या ठिकाणी तैनात असून, खदानीजवळ नातेवाईकांनी एकच गर्दी केली आहे.