अकोला - जिल्ह्यामध्ये सरत्या वर्षात राजकीय, गुन्हेगारी, सांस्कृतिक, कृषी आणि क्रीडा क्षेत्राने राज्यभरातच नव्हे तर देशभरामध्ये ओळख निर्माण केली आहे. सरत्या वर्षामध्ये घडलेल्या घडामोडी अकोलाकरांना एकापेक्षा एक धक्के देणाऱ्या ठरल्या आहेत. या सरत्या वर्षातील या घडामोडींपेक्षा नवीन वर्षामध्ये त्यापेक्षा चांगल्या घडामोडी घडाव्यात, अशी अपेक्षा अकोलाकरांकडून व्यक्त केल्या जात आहे. तीनवेळा निवडून आलेले सेनेचे आमदार गोपिकीशन बाजोरिया यांना भाजपाने विधान परिषदेच्या निवडणुकीत धक्का देत ही जागा काबीज केली आहे.
- राजकीय बदल : विधान परिषदेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीमध्ये तीन वेळा निवडून आलेले शिवसेनेचे आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा भाजपाचे उमेदवार वसंत खंडेलवाल यांनी पराभव केला. ही शिवसेनेसाठी सर्वात मोठी धक्कादायक बाब होती. मात्र, या विजयाने भाजपाच्या जिल्ह्यातील आमदारांची संख्या 5 झाली आहे. तर शिवसेनेचा एकच आमदार आता या जिल्ह्यात आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषदेमध्ये एक हाती सत्ता राखणाऱ्या वंचित बहुजन आघाडीला सभापतींच्या निवडणुकीत जबर धक्का बसलेला आहे. महाविकास आघाडीला मदत करीत भाजपाने या दोन सभापतीच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीला पूर्ण सत्तेपासून दूर ठेवले आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीच्या भविष्यातील जिल्हा परिषदेमधील राजकारणाला चांगलाच धक्का बसलेला आहे. या घटनेच्या व्यतिरिक्त ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये एक आगळावेगळा चमत्कार अकोलेकरांना पाहायला मिळालेला आहे. शिवसेनेचे अकोटमधील माजी आमदार संजय गावंडे हे मरोडा ग्रामपंचायत येथून सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. सरपंच ते आमदार अशी क्रमवारी अनेक आमदार गाठत असतात. मात्र, अकोट येथील शिवसेनेच्या माजी आमदारांनी उलटी क्रमवारी गाठल्याने राजकीय क्षेत्रातच नव्हे तर सामान्य नागरिकांनाही याचे आश्चर्य वाटत आहे. तर दुसरीकडे प्रकृती खराब असल्याने केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी आपल्या मंत्री पदाचा राजीनामा दिला. सध्या त्यांची प्रकृती बिघडलेली असल्याने ते राजकारणापासून दूर आहेत.
- कृषी क्षेत्रात भरारी : कृषी क्षेत्रामध्ये अकोला जिल्ह्यामध्ये कापसाच्या एचटीबीटी या वानाला केंद्र सरकारने मंजुरी द्यावी, यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन झाले. केंद्र सरकार आणि राज्य सरकारचा विरोध झुगारून शेतकऱ्यांनी हजारो हेक्टरवर एचटीबीटीचा पेरा घेतला. शेतकरी संघटनेकडून एचटीबीटी पेरले गेले असल्याचा दावा राष्ट्रीय अध्यक्ष ललित बाहकर यांनी केला आहे. सोयाबीनचे झालेले मोठ्या प्रमाणात नुकसान, शेतकऱ्यांना पीक विमा न मिळाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने केलेली आंदोलन आणि शिवसेनेने पिक विमा कंपन्यांना धारेवर धरने हे शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी ठरला आहे. नुकसानभरपाईसाठी भाजपने केलेल्या आंदोलनातून शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रक्कम अदा करण्यात राज्य सरकारला भाग पाडले आहे.
- डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची कामगिरी : अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये कृषी क्षेत्रातील अनेक क्रांतिकारक उपायोजना संशोधन झाले आहेत. यासोबतच पारंपारिक ऊर्जा क्षेत्रावर विद्यापीठाची वाटचाल ही या वर्षीची सर्वात मोठी विद्यापीठे क्षेत्रातील बाब आहे. त्यामुळे सौर ऊर्जामध्ये स्वयंपूर्ण झालेले डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे नाव राज्यस्तरावर नव्हे तर देशपातळीवर गेले आहे. जवळपास चारशे पेक्षा जास्त केव्ही वीज निर्मिती सौरऊर्जेवर करण्यात येत असल्याचे विद्यापीठ विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी सांगितले आहे. तसेच नुकत्याच राची येथे झालेल्या विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या बैठकीमध्ये विद्यापीठाला मानांकन मिळाले असल्याची माहितीही त्यांनी दिली.
- क्रीडा आणि कला क्षेत्रातही अकोल्याची भरारी : कोला जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रामध्ये बॉक्सिंग आणि क्रिकेट या दोन क्रीडा प्रकारांमध्ये अकोला क्रिडा प्रबोधनीतील बॉक्सिंगचे विद्यार्थी देशपातळीवर नाव कमवत आहेत. नुकत्याच झालेल्या राष्ट्रीय स्तरावरील बॉक्सिंगमध्ये अकोला जिल्ह्यातील जवळपास 10 बॉक्सरांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. तर रणजी ट्रॉफी या क्रिकेट खेळामध्ये अकोल्यातील पाच खेळाडूंचा समावेश झालेला आहे. त्या सोबतच अमरावती विद्यापीठ क्रिकेट स्पर्धेत अकोल्यातील चार क्रिकेट खेळाडूंचा समावेश झालेला आहे. क्रिकेटच नव्हे तर बॉक्सिंग यासोबतच नेमबाजी मध्येही अकोल्याच्या खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे. कला क्षेत्रामध्ये अकोला जिल्ह्याचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचविण्याचे काम शहरातील सोम्या गुप्ता या सितार वादक लहान मुलीने केले आहे. वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड लंडन या संस्थेने तिला गौरविले आहे. सर्वात लहान सितारवादक म्हणून तिची नोंद या संस्थेने केली आहे. डॉ. डॅडी देशमुख लघुचित्रपट महोत्सव ही अकोल्यात पार पडला आहे.
- कोरोना लसीकरण : जिल्ह्यातील कोरोना विषयक प्रतिबंधाच्या दृष्टिकोनातून लसीकरणाचे काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. जिल्ह्यातील लसीकरण हे जवळपास 16 लाख 80 हजार लोकांना झालेले आहे. त्यामध्ये पहिला डोस घेणाऱ्यांची संख्याही अकरा लाखांच्यावर आहे तर दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्याही सहा लाखांच्या जवळपास आलेली आहे. अकोला जिल्ह्यातील लसीकरणामध्ये राज्यात 28 वा क्रमांक लागत आहे. लसीकरण मोहीम अधिक तीव्र करण्याचा प्रयत्न आरोग्य विभागाकडून सुरू असतानाच ओमायक्रॉनचा रुग्ण अकोल्यातही मिळालेला आहे. परदेशातून आलेल्या 334 नागरिकांपैकी 62 नागरिकांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी आरोग्य विभागाने आता पोलिसांची मदत घेतली आहे. तसेच 68 हजार पंधरा ते अठरा वयोगटातील मुलांचे लसीकरण करण्यात येणार आहे. तर बूस्टर डोस म्हणून 28 हजार फ्रंटवारीयर्स असणारे लसीकरण करण्याचे नियोजन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
- शहर विकासाची कामे : अकोला शहरामध्ये कोरोना महामारीच्या पूर्वीपासून सुरू झालेल्या उड्डाणपुलाचे काम अद्यापही सुरू आहे. तर गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेले राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील चौपदरीकरणाचे काम संपलेले नाही आहे. विशेष म्हणजे, 2014 च्या निवडणुकीपूर्वी नितीन गडकरी यांनी या रस्त्याच्या कामासंदर्भात आखणी केली होती. एका कार्यक्रमामध्ये त्यांनी या रस्त्याचे उद्घाटन केले होते. परंतु, ते काम अजूनही सुरू आहे. अनेक वेळा हे काम बंद पडले. काही वेळाने काम सुरू झाले आता परत हे काम बंद पडलेले आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील चौपदरीकरणाच्या कामामुळे छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. त्यामुळे या रस्त्याचे काम लवकरात लवकर व्हावे, अशी मागणी होत आहे.
- एसटी संप : एसटी कर्मचाऱ्याचा संप सुरू आहे. यामध्ये कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे आंदोलन करून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला आहे. मूर्तिजापूर येथील कर्मचाऱ्यांने आत्महत्येचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे 28 एसटी कर्मचाऱ्यांनी इच्छा मरणाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हाधिकारी यांच्यामार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
हेही वाचा - Aditi Tatkare Resolution 2022 : 'यापुढेही उद्योग विभाग जोमानेच कार्य करणार'