अकोला - जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यात संचारबंदी सुरू असतानाही त्याचे उल्लंघन करून अवैधरित्या देशी दारूची विक्री करणाऱ्या मालक व कर्मचारी विरोधात अकोट शहर पोलिसांनी शनिवारी कारवाई केली. या कारवाईमध्ये तीन लाख दोन हजार 116 रुपयांचा देशी दारूचा माल पोलिसांनी जप्त केला आहे.
अकोट शहरातील मुख्य टपाल कार्यालयाच्या बाजूला असलेल्या ममता बेकरीच्या जवळील किरकोळ दारूच्या दुकानाला राज्य उत्पादन शुल्क विभागाने टाळे लावलेले आहे. तरीही या दुकानाच्या गोदामातून देशी दारूचा माल विक्री केली जात असल्याची माहिती आकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी छापा टाकला असता दुकानाच्या वरच्या मजल्यावरून एक व्यक्ती पांढऱ्या पोत्यामध्ये देशी दारूच्या बॉटल्स भरून दुचाकीवर जाण्यासाठी निघाल्याचे दिसले. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला असता त्याने त्याच्या जवळील ते पोतडे फेकून दिले. पोलिसांनी या पोतड्याची पाहणी केली असता त्यामध्ये 35 देशी दारूचे क्वार्टर फुटलेले मिळाले. तर, तेरा क्वार्टर हे सीलबंद मिळून आले.
पोलिसांनी दुचाकीवर देशी दारू घेऊन जाणाऱ्या व्यक्तीचे नाव शोधले असता, त्याचे नाव संभा थोरात असून तो याच दुकानात मॅनेजर म्हणून काम करत असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी देशी दारूच्या दुकानाकडे आपला मोर्चा वळवला. त्यांना दुकानाच्या वरच्या गोदामांमध्ये 122 देशी दारूचे बॉक्स मिळून आले. या मालाची किंमत तीन लाख दोन हजार 116 रुपये होती. या दुकानाचा मालक जे. बी. जयस्वाल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी त्यानुसार संचारबंदीचे उल्लंघन आणि अवैधरित्या देशी दारू वाहतूकप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई अकोट शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.