अकोला - यंदाच्या पावसाळ्यात गांधीग्राम येथील पूर्णा नदीला पाणी न आल्यामुळे कावडधाऱ्यांची निराशा झाली होती. मात्र, अमरावतीमध्ये पडलेल्या पावसाने पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. आणखी जास्त पाऊस झाल्यास नदीच्या पाण्यात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा श्रावण महिना कावडधाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.
श्रावण महिन्यात अकोल्यातील कावडधारी गांधीग्राम येथील पूर्णा नदीवर येतात. या नदीचे पाणी भरून ते अनवाणी पायाने अकोल्याचे आराध्य दैवत असलेल्या राज राजेश्वर मंदिरात नेतात. त्यानंतर हे पाणी महादेवाच्या पिंडीवर टाकून जलाभिषेक करतात. ही परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे. दरवर्षी कावडधाऱ्यांची संख्या वाढत आहे. मात्र, यावर्षी पावसाने दडी मारल्यामुळे पूर्णा नदीला सोमवारपर्यंत पाणी नव्हते. त्यामुळे जलाभिषेक करता येणार नसल्याने कावडधारी निराश होते. मात्र, अमरावती शहरात पडलेल्या पावसानंतर पूर्णा नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामुळे ४ दिवसांवर येऊन ठेपलेला श्रावण महिना कावडधाऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे.