अकोला - कावड पालखी उत्सवात केवळ मानाच्या पालखीद्वारेच श्रीराजेश्वरला जलाभिषेक करण्याचा निर्णय आज पालकमंत्री बच्चू कडू यांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. कावड-पालखी हा पारंपारिक उत्सव साजरा करण्याबाबत अकोल्याचे पालकमंत्री बच्चू कडू, यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे मंडळाचे प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांसह बैठक झाली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन येथे आयोजित बैठकीत बाळापूरचे आमदार नितीन देशमुख, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, पोलीस अधिक्षक जी. श्रीधर, आणि मंदिर समितीचे विश्वस्त, शिवभक्त मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गेल्या 76 वर्षांची परंपरा असलेल्या श्रीराजेश्वर कावड पालखी महोत्सव यंदा कशा पद्धतीने साजरा करावा आणि परंपरेचे पालन कसे करावे याबाबत राजेश्वर मंदिर समिती, कावड आणि पालखी मंडळे यांनी समन्वयाने निर्णय घेऊन प्रशासनाकडे प्रस्ताव द्यावा, असे आवाहन पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले होते. त्याला प्रतिसाद देत शिवभक्त मंडळ, कावड आणि पालखीचे अध्यक्ष यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेवटच्या सोमवारी केवळ मानाची पालखी वाहनाद्वारे जाऊन अकोल्याचे आराध्य दैवत श्रीराजेश्वर यांना जलाभिषेक करेल, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. अकोल्यात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहतात श्रद्धेपेक्षा लोकांचा जीव मोठा आहे, असे अकोलेकरांनी या निर्णयाद्वारे दाखवून दिले आहे. अकोलेकरांच्या या निर्णयाचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी कौतुक केले. आणि त्यांना येणार्या सण उत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
दरवर्षी 120 मंडळ, आपल्या पालख्या आणि कावड घेऊन श्रीराजेश्वराला जलाभिषेक करण्यासाठी श्रावण महिन्यात येत असतात. कोरोना या आपत्तीच्या प्रसंगी ही परंपरा कशा पद्धतीने पाळली जावी याबाबत सर्व भाविक, मंदिर समिती, कावड आणि पालखी उत्सव समितीचे सदस्य, मंडळांचे प्रतिनिधी यांनी महोत्सवाचा निर्णय घेऊन प्रशासनाला प्रस्ताव आज सादर केला.