अकोला - मोबाईल, लॅपटॉप किंवा नेटवर्कची सुविधेत अडचणी तर काही ठिकाणी या सुविधाच नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणामध्ये अडचणी येत आहेत. ही अडचण लक्षात घेऊन दानापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांनी स्वखर्चातून गावातील घरांच्या भिंतीलाच फलक तयार करून, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक पुस्तकेच अभ्यासासाठी तयार केली आहे. हा प्रयोग विद्यार्थ्यांसाठी अभ्यासातील खंड दूर करणे आणि ऑनलाइन मधील कटकट कमी करण्यासाठी उपयोगी ठरला आहे.
कोरोना महामारीमुळे शाळा बंद असल्याने ग्रामीण भागातील विध्यार्थी शैक्षणिक वातावरणाला पारखा झाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होवू नये म्हणून, ऑनलाइन शिक्षणाचा पर्याय शोधला. ग्रामीण भागातील अनेक पालकांकडे मोबाईल, लॅपटॉप ह्या तंत्रज्ञानाची सुविधा उपलब्ध नाही. यामुळे विद्यार्थ्यांवरील मेहनत वाया जावू नये म्हणून अकोल्यातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मुलांची शाळा दानापूर येथील शिक्षकांनी स्वखर्चातून संसर्गजन्य तिसऱ्या लाटेला तोंड देण्यासाठी गावातील घरांच्या भिंतीवर इयत्ता 1 ते 8 च्या पाठ्यक्रमाचे गल्ली बोळात 200 शैक्षणिक चार्ट चित्रकाराकडून तयार केले आहे. चालता बोलता शिक्षण सुविधा विद्यार्थ्यांसाठी यामुळे उपलब्ध झाली आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जडणघडणीला गतिमानता आली असून जिल्हा परिषद शाळेसह गावातील इतर शाळांच्या विद्यार्थ्यांना या उपक्रमाचा फायदा होत आहे.
शिक्षकांचा अनोखा उपक्रम
गावाची विभागणी चार भागात करून स्थानिक शिक्षक विद्यार्थ्यांना गल्लीबोळातील शैक्षणिक चार्ट कोविड नियम लक्षात घेऊन अध्यापन करून शिक्षण सुरु ठेवत आहे. या उपक्रमाचा फायदा गावातील जवळपास हजार विद्यार्थी घेत आहेत. या उपक्रमासाठी शिक्षकांनी 45 हजार रुपये स्वतः गोळा केले आहे. यामुळे विद्यार्थ्यांना पुन्हा अभ्यासाची गोडी लागली आहे.
अभ्यासात नाही पडला खंड
भिंतीवरील शैक्षणिक चार्टमुळेच्या अनोख्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांचास शिक्षणात खंड पडलाच नाही. तर विद्यार्थ्यांमध्ये कोरोना काळात शिक्षणाची आणखीनच गोडी निर्माण झाली आहे. विद्यार्थी गावातील कुठल्याही गल्लीबोळात फिरत असला तरी त्याला त्याच्या अभ्यासक्रमाचा चार्ट डोळ्यापुढं येतो आणि तो अभ्यास करू लागतो.
बोलक्या भिंती
कोरोना महामारी आली आणि शाळा बंद झाल्या, यामुळे पालकांमध्ये आपल्या पाल्याबद्दल शिक्षणाची चिंता वाढली होती. काही पालकांची हलाखीची परिस्तिथी असल्याने मोबाईल घेता येत नव्हता. तर कुठे नेटवर्कची सुविधा नव्हती, अश्यात दानापूरच्या शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेला बोलक्या भिंतीचा उपक्रम यशस्वी ठरल्याने पालक आपल्या पाल्यांच्या शिक्षणाबद्दल निश्चित झाले आहेत.
ज्ञानदानाती ज्योत ठेवली तेवत
कोविड सारख्या महामारीपासून वाचण्यासाठी शासनाला नाईलाजाने शाळा बंद कराव्या लागल्या. मात्र, ज्ञानदान देण्यासाठी सुविधांची वाट न पाहता दानापूर येथील शिक्षकांनी शक्कल लढवत, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची ज्योत तेवत ठेवली आहे. दानापूरच्या या शिक्षकांचा आदर्श इतरही शाळांनी घेतला, तर कुठल्याही भयंकर परिस्थितीत विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू शकणार नाही, हे मात्र निश्चित.