अकोला - लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणीची रंगीत तालीम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आज खदान येथील शासकीय गोदामात घेतली. यावेळी गोदामामध्ये येणाऱ्या प्रत्येक शासकीय कर्मचारी यांचे ओळखपत्र तपासण्यात आले. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या बॅगही पोलिसांनी तपासल्या. मतमोजणीच्या ठिकाणी केंद्रीय राखीव दल, राज्य राखीव दल आणि अकोला पोलीस यांचा तगडा पहारा आहे.
दुसऱ्या टप्प्यातील अकोला लोकसभा मतदार संघाची निवडणूक १८ एप्रिल रोजी झाली. त्यानंतर देशभरातील विविध टप्प्यांमध्ये निवडणूक चार दिवस आधी संपली निवडणूक संपल्यानंतर मतमोजणी २३ मे रोजी होत आहे. मतमोजणीसाठी अकोला निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण घेतले. तसेच त्यांना मतमोजणी दरम्यान आवश्यक असलेल्या सूचनांची माहिती घेऊन त्यांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेशही त्यांनी दिले.
सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांनी मतमोजणीच्या ठिकाणी पोलिसांचा पहारा लावला. मतमोजणीला उद्या आठ वाजतापासून सुरुवात होणार असली, तरी सर्व कर्मचाऱ्यांनी एक तास आधी मतमोजणीच्या ठिकाणी बोलावले आहे. मतमोजणीच्या आधीची तयारी करून वेळेवर मतमोजणीला सुरुवात होईल. दरम्यान, मतमोजणीच्या एक दिवस आधी शासकीय गोदाम येथे मतमोजणीची अंतिम रंगीत तालीम घेण्यात आली. यावेळी पोलिसांचा तगडा पहारा होता.