अकोला - नागरिकांच्या मागण्यासाठी वंचितने आज (बुधवारी) महापालिकेसमोर शांततेत ठिय्या आंदोलन केले. मात्र, निवेदन देण्यासाठी मनपाच्या आत प्रवेश न देण्यात आल्यामुळे वंचितच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मनपाचे प्रवेशद्वार अक्षरशः खिळखिळे करत ते तोडून आत प्रवेश केला. असाच प्रकार त्यांनी मनपा आयुक्तांच्या कक्षाच्या लोखंडी दरवाजाजवळ केला. त्यानंतर त्यांनी मनपाच्या अधिकाऱ्याला खांद्यावर उचलून निवेदन दिले. वंचित बहुजन आघाडीने मात्र ठिय्या आंदोलनानंतर दादागिरीच केली, अशी प्रतिक्रिया उमटत आहे. दरम्यान, याबाबत सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.
काय आहे प्रकरण?
रस्ते, स्वच्छता, पाणी, टॅक्स, घरकुल, दिवे, कचरा या सर्वच समस्या निकाली काढण्यात सत्ताधारी भारतीय जनता पक्ष अपयशी ठरला आहे. आता हा भ्रष्टाचार महापालिकेतून हद्दपार करण्यासाठी शहरातील जनतेने एकत्र येण्याची गरज आहे, असे म्हणत वंचित बहुजन आघाडीने महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन केले. हे आंदोलन झाल्यानंतर वंचितने निवेदन स्वीकारण्याची वेळ घेतली. परंतु वंचितच्या पदाधिकारी यांना आत जाऊ देण्यात आले नाही. शेवटी वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, युवक आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांनी कार्यकर्त्यांसोबत मनपाचे प्रवेशद्वार खिळखिळे करत ते तोडले. त्यांनी आतमध्ये प्रवेश करत जोरदार नारेबाजी केली. त्यानंतर मनपा आयुक्त यांच्या कक्षाच्या लोखंडी खोलीचा दरवाजा तोडला. आत प्रवेश केला. त्यानंतर मनपाचे अधिकारी हे निवेदन घेण्यासाठी आले असता त्यांना खांद्यावर बसून निवेदन देण्यात आले. हा सर्व प्रकार मनपा कर्मचारी, उपस्थित काही नगरसेवक यांच्यासमोरच घडला. वंचित बहुजन आघाडीचे शहर अध्यक्ष शंकरराव इंगळे यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये वंचितचे प्रदेश उपाध्यक्ष धैर्यवर्धन पुंडकर, महासचिव अरुंधती शिरसाट, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, युवक आघाडीचे महासचिव राजेंद्र पातोडे यांच्यासह जिल्हा परिषद पदाधिकारी व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
कोरोना नियमांचे उल्लंघन
सप्टेंबरपासून देशात तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत असताना प्रशासनाकडून वारंवार सूचना दिल्या जात आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे, हात सानिटाईझ करणे. या नियमांचे या आंदोलनात संपूर्णपणे उल्लंघन झालेले दिसून आले.
'या' आहेत प्रमुख मागण्या
महानगरातील गरिबांची घरकुल पूर्ण करण्यात यावे, पूरग्रस्त भागातील नागरिकांचे सर्वेक्षण पुन्हा करण्यात यावे, पूरग्रस्तांचे वीज बिल माफ करावे, महिला बचत गटांना कर्ज माफ करून वाढीव अनुदान व कर्जाचे वितरण करावे, मनपामध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी सफाई कामगार काम करत आहे, त्यांना मनपामध्ये कायमस्वरूपी नोकरी देण्यात यावी, दलित वस्ती सुधार योजना, पडीक वॉर्डमधील कामांची चौकशी लावून त्याचे सोशल ऑडिट करण्यात यावे.
हेही वाचा - बीडीडी चाळीतील रहिवाशांना खूशखबर.. मूळ सदनिकाधारकांना मुद्रांक शुल्क लागणार केवळ एक हजार रुपये