अकोला - सार्वजनिक बससेवा सुरू करण्यात यावी या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आज राज्यव्यापी आंदोलन सुरू केले आहे. अकोला शहरातील बसस्थानक चौकातही 'डफली बजाव आंदोलन' करण्यात आले. प्रदेश प्रवक्ता राजेंद्र पातोडे यांनी स्वतः डफली वाजवून आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला.
केंद्र व राज्य सरकारने कोरोनाच्या नावावर लोकशाही कुलूपबंद केली आहे. राज्यातील एसटी सेवा व महानगरातील सार्वजनिक बससेवा सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी प्रकाश आंबेडकर यांच्या आदेशानुसार 'डफली बजाव आंदोलन' केले जात आहे. शहरातील जुने बसस्थानक चौकात महिला आघाडी तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर खुले नाट्यगृहासमोर महानगर पूर्व, महानगरपालिके समोर, महानगर पश्चिम आणि एसटी विभागीय कार्यालयासमोर आंदोलने करण्यात आली.
या आंदोलनात प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, प्रदीप वानखडे, दीपक गवई, दिनकर खंडारे, महादेव शिरसाट, विकास सदांशीव, सचिन शिराळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.