अकोला - यावर्षी लांबलेल्या परतीच्या पावसामुळे शेतीचे नुकसान झाल्याने ऐन दिवाळीत शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत आहे. सततच्या पावसामुळे शेतात पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सरकारने अतिवृष्टी झालेल्या ठिकाणी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीतर्फे करण्यात आली. तसेच शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती देऊन त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी कार्य करण्याचे या मागण्यांमध्ये नमूद करण्यात आले आहे.
गेल्या आठ दिवसांपासून जिल्ह्यात सतत परतीचा पाऊस पडत आहे. यामुळे सोयाबीनला कोंब फुटले असून, कपसाच्या पिकाचेही नुकसान झाले आहे. यासाठी शासनाने नुकसान झालेल्या भागांचा पंचनामा करून तत्काळ ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी वंबआने केली आहे. तसेच शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देणे,इ. मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन आघाडीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
यावेळी प्रदेशाध्यक्ष अशोक सोनोने, प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, प्रा. धैर्यवर्धन पुंडकर, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, भरिपचे जिल्हाध्यक्ष प्रदिप वानखेडे तसेच महिला जिल्हाध्यक्षा प्रभा शिरसाट, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.