अकोला - अवकाळी पावसाने आज सायंकाळी तब्बल अर्धातास हजेरी लावली. पातूर व बाळापुरात पावसाची रिमझिम पाऊस झाला. अवकाळी पावसाच्या हजेरीने एकच तारांबळ उडाली.
अकोल्यात सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारी कडक ऊन पडले. त्यानंतर सायंकाळपासून ढगाळ वातावरण व जोरदार वारा सुटला होता. पातूर व बाळापुरात पावसाने किरकोळ स्वरूपाची हजेरी लावली. या तालुक्यांमध्ये ढग दाटून आले होते.
अकोल्यात सायंकाळी ढग दाटून आल्याने पावसाने सायंकाळी 5 वाजून 45 मिनिटांनी वादळी वाऱ्यासह जोरदार हजेरी लावली. यानंतर पावसाने सुरुवात केली. अचानक आलेल्या पावसामुळे एकच तारांबळ उडाली. रस्त्यावर असलेल्या नागरिकांनी पावसापासून बचाव करण्यासाठी सुरक्षित जागेचा शोध घेतला.
अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची वाढविली चिंता-
दरम्यान, आधीच कपाशीवर असलेल्या बोंडअळीमुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांना अवकाळी पावसाने लावलेल्या हजेरीने चिंतेत टाकले आहे. तर हरभऱ्याची पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. अवकाळी पावसामुळे कपाशी काढणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
अमरावतीतही पाऊस-
हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार आज (दि. 19 नोव्हेंबर) अमरावती शहरा लगतच्या बडनेरा व इतर ग्रामीण भागातही वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे कापूस व तुरीला या पावसाचा जबर फटका बसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.