अकोला - शहरातील डाबकी रोड हद्दीत आज खळबळजनक घटना घडली आहे. भौरद येथील एका व्यक्तीने चक्क पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांची शासकीय वाहन फोडले. तसेच भौरद येथे आलेल्या पाहुण्या व्यक्तीची दुचाकी फोडण्याचा प्रकार त्याने केला आहे. दरम्यान, पोलिसांनी त्या व्यक्तीस अटक केली असून त्यांच्याकडील कुऱ्हाड जप्त केली आहे.
ढगादेवी येथील रहिवासी गोवर्धन वानखडे हे भौरद येथे लग्नसमारंभासाठी दुचाकीने आले होते. गोवर्धन वानखडे यांनी याच भागात राहणाऱ्या एका व्यक्तीला लग्न समारंभाचा पत्ता विचारला. त्या व्यक्तीने 'तुम्ही पोलीस आहात का'असे विचारत गोवर्धन वानखडे यांच्या दुचाकीची कुऱ्हाडीने तोडफोड केली.
यानंतर तो व्यक्ती ऑटोने डाबकी रोड हद्दीत आला. डाबकी रोड पोलीस ठाण्यासमोर उभी असलेले शासकीय चारचाकी वाहनांचे समोरील हेडलाइट त्याने फोडले. तो एवढ्यावरच थांबला नाही तर काळा मारुती रस्त्यावरील अलका बॅटरी दुकानाजवळून जात असलेली डाबकी रोड पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांचे नवीन शासकीय वाहनही फोडले. या वाहनाच्या समोरील आणि मागील काचा फोडून हेडलाईट ही फोडले.
या घटनेची माहिती जुने शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार देशमुख यांना मिळाली. त्यांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन डाबकी रोड पोलिसांच्या स्वाधीन केले. डाबकी रोड पोलिसांनी त्या व्यक्तीस अटक केली असून त्याच्याकडून कुऱ्हाड जप्त केली आहे. दरम्यान, याबाबत डाबकी रोड पोलीस निरीक्षक नाफडे यांना विचारणा केली असता ते काहीही बोलण्यास तयार नव्हते.