अकोला - मेडिकल स्टोअर्सवर औषधे घेण्यासाठी थांबलेल्या ग्राहकाच्या दुचाकीतील डिक्कीतून 2 लाख रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केल्याची घटना घडली. शुक्रवारी दुपारच्या सुमारास ही घटना घडली. सावित्री संतोषकुमार खंडेलवाल यांची रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. याप्रकरणी रामदासपेठ पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाच्या कार्यालयासमोरील सहयोग मेडिकलमध्ये सावित्री संतोषकुमार खंडेलवाल औषधे घेण्यासाठी थांबल्या होत्या. त्यावेळी त्यांनी बँकेतून आणलेले 2 लाख रुपये दुचाकीच्या डिक्कीमध्ये ठेवले होते. त्यावेळी चोरांनी दुचाकीच्या डिक्कीतून 2 लाख रुपये लंपास केले. सावित्री यांनी ही रक्कम गुढघ्याच्या शस्त्रक्रियेसाठी काढली होती.
डिक्कीतून पैशांची बॅग चोरी झाल्याचे सावित्री यांच्या लक्षात येताच त्यांनी रामदास पेठ पोलिसांना घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सीसीटीव्ही रेकॉर्ड तपासले. यामध्ये चोरीची घटना कैद झाली आहे. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.