अकोला- केंद्र शासनाने 17 मे पर्यंत वाढवलेल्या लॉकडाऊन कालावधी याबाबत जिल्हा प्रशासनाने आदेश जारी केले आहेत. त्यानुसार 3 मेच्या मध्यरात्रीपासून ते मंगळवार 5 मेच्या मध्यरात्रीपर्यंत अकोला महानगरपालिका हद्दीत वैद्यकीय सेवा वगळता संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. मनपा क्षेत्र वगळता अन्य भागात मागील आदेशाप्रमाणे लॉकडाऊनचे पालन होईल. 5 मे नंतर मनपा हद्दीत सम तारखांना पूर्वीच्या आदेशाप्रमाणे तर विषम तारखांना संपूर्ण लॉकडाऊन पाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
अकोला मनपा हद्दीत कालावधीत 3 ते 5 मे दरम्यान वैद्यकीय सेवा वगळता सर्व अत्यावश्यक सेवांसह बंद पाळण्यात येणार आहेत. दुध व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीला सकाळी सहा ते दहा व सायंकाळी चार ते सहा यावेळात परवानगी देण्यात आली आहे. तसेच दैनिक वृत्तपत्रांचे वितरण सुरु राहील, असे जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.या कालावधीत मनपा हद्दीतील सर्व बॅंका, एलआयसी इ. सेवा बंद राहतील. अत्यावश्यक सेवांव्यतिरिक्त कोणत्याही व्यक्तीला मुक्त संचार करता येणार नाही. अत्यावश्यक सेवेतील वाहनांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगीने सुरु असलेले मनपा हद्दीतील पेट्रोल व डिजेल पंप वगळून अन्य सर्व पंप बंद राहतील.
नगरपरिषद व ग्रामीण भागातील पेट्रोल डिजेल पंप सुरु राहतील. एमआयडीसी अकोला येथील परवानगी दिलेले उद्योग सुरु राहतील. तथापि, नगरपरिषद व ग्रामीण भागासाठी 19 एप्रिलला दिलेले आदेश लागू राहतील.
सम तारखांना मर्यादित तर विषम तारखांना पूर्ण लॉकडाऊन
अकोला मनपा हद्दीत जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार, सम तारखांना म्हणजे 6, 8, 10, 12, 14 व 16 मे रोजी 19 एप्रिलच्या आदेशाप्रमाणे संचारबंदी कायम राहील.तर विषम तारखांना म्हणजेच 7, 9, 11, 13, 15, व 17 तारखेला रविवारी जारी करण्यात आलेल्या आदेशाप्रमाणे वैद्यकीय सेवा वगळता मनपा हद्दीत संपूर्ण लॉकडाऊन पाळण्यात येईल. या आदेशाचा भंग झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
शहराबाहेरील कृषी उत्पन्न बाजार समिती सुरु राहणार
4 व 5 मे रोजीचे संपुर्ण लाॅकडाऊन हे फक्त अकोला महानगरपालीका क्षेत्रासाठी असल्यामुळे अकोला शहराबाहेरील अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती, नाफेड, सीसीआय व कापुस पणन महासंघाची खरेदी सुरु राहतील. अकोला येथील नाफेड केंद्रावर तुर-हरभरा ची खरेदी सुरु राहील. फक्त अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती बंद राहणार आहे, असे आदेश जिंतेंद्र पापळकर जिल्हाधिकारी अकोला यांनी दिले आहेत.