अकोला - मेळघाट मधील दीपाली चव्हाण यांच्या आत्महत्या प्रकरणात सरकारने जी तत्परता दाखवायला पाहिजे होती, ती दाखवली नाही. ही शोकांतिका आहे. रेड्डी यास निलंबित केले आहे. परंतु, त्याच्यावर अबेडमेन्टचा गुन्हा दाखल झाल्यास सर्व सत्य बाहेर येईल, असे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे. हा गुन्हा दाखल व्हावा, यासाठी आम्ही शासनाकडे मागणी करत आहोत.
शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. पुढे ते म्हणाले, या प्रकरणांमध्ये एनजीओ यांचा पण काय सहभाग आहे; याचा तपास शासनाने करायला पाहिजे. यासंदर्भात माझ्याकडे संपूर्ण माहिती आहे. ही माहिती वंचित बहुजन आघाडीच्या अमरावती येथील पदाधिकारी प्रा. इशा शेंडे या उघड करतील; जर शासनाने ती माहिती उघड केली नाही तर. त्यानंतर या प्रकरणातील सर्व सत्य बाहेर येईल, असेही त्यांनी सांगितले. यासाठी आम्ही सरकारला आठ दिवसांचा वेळ देत असल्याचेही ते म्हणाले.
दिपालीच्या तक्रारीच्या दखल घेतली नाही -
दीपाली चव्हाण यांनी वरिष्ठांकडे तक्रारी केलेले आहेत. त्या तक्रारीची दखल घेण्यात आलेले नाही. ज्या विभागामध्ये हे प्रकरण घडलेले आहे. त्या विभागाच्या मंत्री यशोमती ठाकूर या अमरावतीच्या आहेत. वनविभागाच्या कार्यालयात महिलांच्या तक्रारींच्या संदर्भातील असलेली समिती स्थापन नसल्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. अमरावतीच्या वनविभागातच नव्हे तर सर्वच विभागांमध्ये या समित्या नाहीत. राज्याची पण हीच परिस्थिती असल्याचा आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. या पत्रकार परिषदेला प्रदेश उपाध्यक्ष प्रा. धैर्यवर्धन फुंडकर, भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप वानखडे हे उपस्थित होते.