अकोला - परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघात नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली. आपातापा, दहिगाव गावंडे, पळसो बढे या गावात जाऊन त्यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधला. नुकसान झालेल्या पिकांचा आणि कृषी अधिकारी, महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या पंचनाम्यांचा रावते यांनी आढावा घेतला.
शेतकऱ्यांनी वीज बिल माफ करण्यासाठी परिवहन मंत्र्यांना साकडे घातले. ज्या शेतकऱ्यांनी खराब झालेल्या सोयाबीनची काढणी केली आहे, त्या शेतकऱ्यांना ही भरपाई देण्याचे आश्वासन रावते यांनी दिले. सततच्या पावसामुळे विदर्भातील पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. अकोला जिल्ह्यातही परतीच्या पावसाने हजारो हेक्टर पिकांचे नुकसान झाले आहे. आठवडाभरातील संततधार पावसाने ज्वारी, कपाशी आणि सोयाबीन पिकांची नासाडी झाली आहे. अनेक ठिकाणी सोयाबीन शेतातच सडले असून ज्वारीच्या कणसांना कोंब फुटले आहेत. कपाशीचा पहिला वेचाही झाला नाही परिणामी संपूर्ण माल पावसामुळे झडून गेला आहे. जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी लावून धरली आहे.
हेही वाचा - धक्कादायक.. नाशिकच्या दिंडोरी तालुक्यात दहा महिन्यात १६ शेतकऱ्यांच्या आत्महत्या
ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला त्यांना पीक विमा भरपाई मिळेल. मात्र, ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा काढला नसेल त्यांनाही मदत मिळावी याबाबत शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे दिवाकर रावते यांनी सांगितले. यावेळी त्यांच्यासोबत कृषी अधिकारी, अतिरिक्त जिल्हाधिकारी आणि सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेचे आमदार असलेल्या मतदारसंघात गेले नाहीत परिवहन मंत्री
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार नितीन देशमुख हे बाळापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले. जिल्ह्यात परिवहन मंत्री दिवाकर रावते हे नुकसानग्रस्त शेतीची माहिती घेण्यासाठी आले. त्यांनी भाजपचे नवनिर्वाचित आमदार रणधीर सावरकर यांच्या अकोला पूर्व मतदार संघात जाऊन नुकसानीची पाहणी केली. मात्र, दिवाकर रावते यांनी बाळापूर विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख यांच्या मतदारसंघात जाण्याचे टाळले. त्यांच्या या धोरणामुळे परिवहन मंत्री रावते यांनी पक्षाच्या आमदाराच्या मतदारसंघाकडे कानाडोळा केल्याची चर्चा आहे.