अकोला - चेन्नई येथील कुटुंब अकोल्यात मुलगी पाहण्यासाठी आले असताना, येथील काही तरुणांनी त्यांना मारहाण करून लुटल्याची घटना घडली आहे. तब्बल 11 लाख 68 हजारांच्या मुद्देमालावर या तरुणांनी डल्ला मारला. या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक करून त्यांच्याकडून 10 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मरदिप पाटील, अमोल मोरे, अभिजित इंगोले असे या आरोपींची नावे आहेत.
चेन्नई येथील दिपकराज भीमराज जैन हे मुलाच्या लग्नासाठी मुलीच्या शोधात होते. त्यांचा नातेवाईक असलेल्या कैलासने अकोल्यातील एक व्यक्ती मॅरेज ब्युरो चालवत असल्याची माहिती त्यांना दिली. तसेच त्याच्याशी मोबाईच्या माध्यमातून संपर्क देखील साधून दिला होता. त्यानुसार दिपकराज जैन, मुलगा दिलीपकुमार जैन, आई, बहीण आणि भाचा हे अकोल्यात आले. त्यांनी येथील व्यक्तीशी संपर्क साधला. त्याने या सर्वांना ऑटोमध्ये बसवून विझोरा गावाच्या रस्त्यावर नेले. तीथे आधीच दोन जण दुचाकीवर हजर होते. या तिघांनी मिळून त्यांना मारहाण केली. तसेच त्यांच्या जवळील सर्व मुद्देमाल घेऊन घटनास्थळावरून पोबारा केला.
दरम्यान या प्रकरणी दिपकराज यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. गुन्ह्याची व्याप्ती पाहता सहायक पोलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक जयंत सोनटक्के, अश्विन मिश्रा, किशोर सोनोने, वसीम शेख, शक्ती कांबळे, सायबर सेलचे सहायक पोलिस निरीक्षक प्रशांत संदे, गणेश सोनोने यांनी तपास सुरू केला. या तपासात पोलिसांनी अमरदिप पाटील, अमोल मोरे, अभिजित इंगोले या तिघांना ताब्यात घेऊन त्यांची विचारपूस केली. या तिघांनी आणखी दोघे सोबत असल्याचे सांगून गुन्हा कबूल केला. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरलेल्या मुद्देमालापैकी 10 लाखांचा ऐवज जप्त केला आहे.