अकोला - जुने शहरातील गीता नगरात तीन घरात चोरी करून भाड्याने आणलेल्या कारमधून चोर पसार झाले होते. जुने शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेने यामध्ये उत्तर प्रदेशमधून तिघांना विविध ठिकाणांवरून अटक केली आहे. या तिघांकडून सहा लाख 11 हजार 787 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चोरट्याना जुने शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
गीता नगरातील लखन शर्मा, खुशाल नेमाडे, आशिष मनोहर यांनी जुने शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तिघांच्या घरातून एक लाख सात हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. विशेष म्हणजे, चोरटे हे भाड्याने आणलेली कार घेऊन पसार झाले. स्थानिक गुन्हे शाखेने या प्रकरणात तपासाची चक्रे वेगाने फिरवीत यामध्ये उत्तर प्रदेश येथून मोहम्मद रशीद उर्फ मुन्ना मोहम्मद साहिल, शान उर्फ शानु मोहम्मद सलिम आणि मोहम्मद मोहसीन उर्फ काला मोहम्मद सगीर यांना अटक केली. या तिघांकडून एक लाख 11 हजार 787 रुपयांचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली कार क्रमांक यूपी 14 एफटी 3818 किंमत पाच लाख रुपयांची जप्त करून सहा लाख 11 हजार 787 रुपये जप्त केले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक शैलेश सपकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार यांच्या पथकाने केली. तिन्ही आरोपींना जुने शहर पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.
सायबर शाखेची झाली मदत
या तीन चोरट्याना पकडण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला सायबर शाखेची मदत झाली. या घटनेच्या दिवशीचा चोरीच्या घटनास्थळाजवळील मोबाईल डपंडाटा काढून या चोरट्यांचा शोध घेण्यास मदत झाली. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेने या तिघांना अटक केली.