अकोला - तेल्हारा शहरातील मुख्य मार्गावर असलेल्या तीन दुकानात अज्ञात चोरट्यांनी चोरी केली. ही घटना २३ जानेवारीला रात्रीच्या सुमारास घडली. चोरट्यांनी दुकान फोडून त्यातील लॅपटॉप, काजू, बदाम व इतर साहित्यासह रोख असा ८८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. दरम्यान, ही घटना एका दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.
चोरट्यांनी तेल्हारा शहरातील रतनलाल रामलाल पालिवाल यांच्या किराणा दुकानातून ९ हजार रुपये रोख, स्कूल बॅगमधील लॅपटॉप, काजू, बदाम, सीमकार्ड असा ५५ हजार ५०० रुपयांचा माल लंपास केला. त्याचबरोबर, न. प. शाळा क्र.१ जवळील अनील रामभाऊ घोडेस्वार यांच्या गोळ्या-बिस्किटच्या दुकानातून विविध वस्तू किंमत २५ हजार रुपयांचे सामान आणि सुनीलकुमार सत्यनारायण बागाणी यांच्या दुकानाचे शटरचे कुलूप तोडून ८ हजार रुपये नगदी चोरट्यांनी लंपास केले.
चोरट्यांनी अन्य दुकानाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची दिशा बदलून सावधगिरी बाळगली. चोरट्यांनी एका दुकानातील सीसीटीव्ही केबलही कापले. तरी देखील फिर्यादीच्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये चोरटा कैद झाल्याचे सीसीटीव्ही फुटेज तपासात दिसून आले. चोरट्यांनी लोखंडी अवजाराचा वापर करून कुलूप तोडले. तेल्हारा पोलिसांनी आरोपींविरुद्ध भा.दं.वि कलम ३८०, ४५७, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पो.नि. विकास देवरे यांच्या मार्गदर्शनात सुभाष खडसे करीत आहेत.
हेही वाचा- अकोल्यात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा रास्तारोको, गृहमंत्र्यांविरोधात नारेबाजी